निफाड | प्रतिनिधी
देशाचा कॅलिफोर्निया असलेल्या निफाड तालुक्यात ऑक्टोबर हीट संपल्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीने हुडहुडी भरल्याने विधानसभा निवडणुकीचा माहोल गरम जोशाच्या वातावरणात पार पडला. मात्र थंडीने डोके वर काढत निफाड तालुक्यात बोचऱ्या थंडीची हुडहुडी भरून दिल्याने नागरिकांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. तर जागोजागी शेकोट्यांचा वापर वाढला.
यावर्षी सरासरी पेक्षा पावसाचे प्रमाण निफाड तालुक्यात जास्त झाल्याने नद्या, नाले, ओहोळ, कालवे पाण्याने भरून वाहत असल्याने थंडीचे प्रमाण जास्तच राहील, असे हवामान खात्याकडून व जुन्या जाणत्या लोकांकडून सांगितले जात होते. नोव्हेंबर अखेरच्या आठवड्यात थंडीने जोर धरला. तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली होत गेल्याने उबदार कपडे घालण्यात नागरिकांना पर्याय राहिला नाही. थंडी कमी होण्याऐवजी अजून वाढायला लागल्याने सकाळी व रात्री फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण काही प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येते आहे.
थंडीमुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदे यांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु याचा फटका देशात तसेच जगात नाव असलेल्या द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे. दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत पारा घसरला तर फुगवणीसाठी व भुरी या रोगासाठी द्राक्षबागांना यांचा फटका बसणार असल्याने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये घट होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ८.३ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या कमी निचांकी तापमानाची नोंद गुरुवार (दि. २८) नोव्हेंबर रोजी हवामान विभागाने दिली आहे.
हे ही वाचा: टोमॅटोच्या शेतीत गांजाची बेकायदेशीर लागवड; १२ लाखा ९३ हजार झाडे जप्त करत शेतकऱ्याला बेड्या
दिंडोरीत थंडीचा कडाका वाढला
दिंडोरी तालुक्यात थंडीच्या कडक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतीच्या कामकाजावरही परिणाम जाणवत आहे. थंडीची तीव्रता वाढत असल्याने सकाळऐवजी दुपारी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. थंडीचे प्रमाण चांगले असल्याने पहाटे जॉगिंग व व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची वर्दळही वाढली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडीला सुगीचे दिवस आले आहेत.
काही भागात विविध पिकांच्या लागवडीला उशीर झाला असला तरी गहू, हरभरा आदी पिकांच्या लागवडीने सर्वत्र वेग घेतला आहे. तसेच कडाक्याच्या थंडीने रात्री पडणाऱ्या दवामुळे व गारव्यामुळे पिकांना दिलासा मिळत आहे. थंडीने या हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे आता शेतकरी हंगामासाठी सरसावले आहेत. यामुळे रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या पहाटे थंडी, दुपारी ऊन व रात्री पुन्हा गारवा असा प्रकार पाहावयास मिळत आहे.