सलग सहा दशकांपेक्षा जास्त काळ गात राहणे हाच एक चमत्कार असून तो लता मंगेशकरांच्या रूपाने प्रत्ययाला आला. काळ बदलला, श्रोत्यांच्या तर अनेक पिढ्या बदलल्या, मात्र यू ट्यूब आणि मोबाईल अॅप्सच्या युगातल्या आजच्या तरुणाईवरही लता मंगेशकरांच्या आवाजाचे गारूड कायम आहे. कारण त्यांचा स्वर कालातीत आहे.
भारतीय चित्रपट 1932 मध्ये बोलू लागला आणि लगेच गाऊही लागला. बोलपटांच्या प्रारंभीच्या काळात अभिनेत्यांना स्वतःची गाणी स्वतःच म्हणावी लागत. मंद्र आणि मध्य सप्तकात गाणे ही प्रस्थापित पद्धत होती. संगीतकार त्या गायिकांना आणि नटांना जमेल, ‘झेपेल’ अशाच चाली बांधत. त्यांना लोकप्रियता मिळत होती. कारण माध्यमाची नवलाई होती. बोलपट स्थिरावून जेमतेम 15 वर्षे होत होती. त्या सुमारास चित्रपटसृष्टीत एका चमत्काराचा उदय झाला. लता मंगेशकर हे त्या चमत्काराचे नाव. आता हा चमत्कार लयाला गेला आहे. लतादीदी अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत, पण अवघे नादविश्व व्यापणारा हा स्वर अजरामर राहणार आहे.
त्या कालखंडात लाहोरहून आलेल्या, ‘मास्टरजी’ नावाने ख्यातनाम असलेल्या गुलाम हैदर या संगीतकाराने एका छोट्या, कृश मुलीच्या आवाजाची चाचणी घेतली. शशधर मुखर्जींसारख्या दिग्गज निर्मात्याने तो आवाज फारच पातळ असल्याचे सांगून नाकारला. त्याचवेळी हैदर म्हणाले, ‘एक काळ असा येईल की अवघी भारतीय चित्रपटसृष्टी या मुलीच्या पायाशी असेल’. मुखर्जी यांच्या नजरेसमोर आणि कानात गोहरजान, अमीरबाई, जोहरा अंबालावाली, अख्तरी फैजाबादी (महान गझल गायिका बेगम अख्तर) नंतर आलेली शमशाद या गायिका असल्याने त्यांना लताचा आवाज पातळ वाटला असावा. पण गुलाम हैदर यांनी शोधलेली नवी गायिका कोण हे पाहण्यास जे आले होते त्यांना या युवा गायिकेच्या क्षमतेचा अंदाज आला. अनिल विश्वास, नौशाद, श्याम सुंदर, खेमचंद प्रकाश या दिग्गज संगीतकारांनी लताला निमंत्रण दिले. ‘मजबूर’, ‘अंदाज’, ‘महल’, ‘बाजार’, ‘लाहोर’ असे चित्रपट एकामागोमाग येत गेले आणि गुलाम हैदर यांची भविष्यवाणी खरी ठरली. निर्माता-अभिनेता-दिग्दर्शक राज कपूर, नव्याने प्रवेशणारे संगीतकार शंकर-जयकिशन आणि धडपडणारी लता एकत्र आले अणि ‘बरसात’ हा चित्रपट आला. त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत आणि गाणे कायमचे बदलले. तेव्हापासून सुरू झालेला स्वरांचा सोहळा आजतागायत सुरूच आहे आणि असंख्य रसिक त्या सोहळ्यात पुन्हा पुन्हा तृप्ततेची अनुभूती घेत आहेत.
अभिनेत्री, संगीतकार यांच्या पिढ्या बदलल्या पण लता मंगेशकर हे नाव ध्रुवतार्याप्रमाणे अढळ आहे. अर्थात, हे यश सहजसाध्य नव्हते. लतादीदींनी त्यासाठी अपरंपार कष्ट घेतले. पोरवयात पडलेली कुटुंबाची जबाबदारी सांभाळत लतादीदींनी स्वरांचे एक अफाट विश्व उभे केले. हिंदी-उर्दू शब्दांचे उच्चार असोत किंवा लाहोर घराण्याची, पंजाबी-पतियाळा शैली असो, ठुमरीची बनारस शैली असो, बंगालमधून आलेली बाऊल शैली असो, असे गायकीचे रंग लतादीदींनी रसिकांसमोर पेश केले. अनिल विश्वास यांच्याकडून ध्वनिवर्धकासमोर (मायक्रोफोन) गाताना श्वास कसा सांभाळावा हे त्या शिकल्या. तसेच श्यामसुंदर, नौशाद यांच्यापासून प्रत्येक संगीतकाराकडून काही शिकण्यासारखे असते, असे समजून त्या शिकत आणि आपल्यात सुधारणा करत गेल्या. हे जसे खरे आहे तसेच तीन सप्तकांची मर्यादा न जुमानणारा त्यांचा सुरेल आवाज प्रत्येक संगीतकाराच्या प्रतिभेसमोर नवे सृजनात्मक आव्हान उभे करत होता, हेही खरे आहे. या आवाजाला नादसृष्टीतले काहीही अशक्य नाही हे लक्षात आल्याने संगीतकारदेखील लतादीदींसाठी अवघड स्वररचना बांधत गेले आणि दीदींनी ते सारे स्वराकार अधिक सुंदर करून मांडले.
सज्जाद हुसेन हा अफाट प्रतिभेचा, विक्षिप्त गणला गेलेला संगीतकार. ‘वो तो चले गये ऐ दिल’ किंवा ‘काली काली रात रे दिल बडा सताये’ ही गाणी स्वरबद्ध करताना लता मंगेशकर ही गायिका त्याच्या डोळ्यासमोर होती. त्याआधी त्यानेही अशा चाली दिल्या नव्हत्या. लयीला आणि स्वर सांभाळायला अतिशय अवघड अशा रचना सज्जादने दिल्या त्या केवळ लतादीदींच्या आवाजाच्या आणि गानक्षमतेच्या आधारावर. तेच मदनमोहन आणि सी. रामचंद्र यांच्या बाबतीत म्हणता येईल. श्याम सुंदर, नौशाद, सलील चौधरी, जयदेव यांचाही उल्लेख आवश्यकच.
काळ बदलला, संगीतकार बदलले, श्रोत्यांच्या पिढ्या बदलल्या, त्यांची आवड बदलली तरी लतादीदी गातच राहिल्या, त्यांची गाणी सर्वांना आवडतच राहिली. ते का? स्वत: लतादीदीदेखील याकाळात बदलत राहिल्या. अनिल विश्वास, सी. रामचंद्र, सज्जाद, सचिन देव बर्मनपासून शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बप्पी लाहिरी, आर. डी. बर्मन ते ए. आर. रेहमानपर्यंत असंख्य संगीतकारांची शैली वेगळी, रंग वेगळा. त्यात लता मंगेशकर हेच समान सूत्र. त्यांच्या असीम क्षमतेमुळेच प्रत्येक निर्मात्याला, संगीत दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटात लताचे गाणे असणे आवश्यक वाटत होते. ‘ओ मेरे सनम’ची आधीची तान कोणाला जमली असती? ‘हम हैं मतां ए कूचा बाजार की तरहा’ या गीतातल्या शब्दांचे उच्चार आणि स्वरांच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक गाणे कोणाला पेलले असते?
1970 च्या दशकाचा उल्लेख (की संभावना) आताची पिढी ‘रेट्रो’ असा करते. याच दशकातल्या ‘दिलबर… दिल से प्यारे’ (कारवां) या गाण्यातली लयकारी ऐकण्यासारखी आहे. ‘अमर प्रेम’मधले ‘रैना बीती जाये’ हे गाणे ‘ललत’ (पंचम ललत?) ‘तोडी’ यांच्या सुरांवर आधारित आहे. त्यातल्या ‘श्याम’ या शब्दाच्या ‘म’ वर येणारा दीदींचा स्वर उगवत्या सूर्याचे तेज घेऊन येतो. मदन मोहनच्या ‘है तेरे साथ मेरी वफा’मधला ‘फा’ वरचा ‘कोमल धैवत’ भैरव रागाची छाया घेऊन येतो. हे अस्सल तानपुर्याचे गाणे आहे.
बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली चित्रपटातली गाणी, भावगीते किंवा मीराबाईची भजने हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. त्यांच्या स्वररचनांना दीदींनी दिलेले स्वररूप ऐकताना श्रोता थक्क होतो. त्यांच्या गळ्यात गंधार आहे असे वर्णन करणे सोपे आहे, पण तो स्वर जपण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रचंड रियाजाची कल्पना फार थोड्यांना असेल. त्यांची ही तपश्चर्या पाहूनच श्री मंगेश त्यांच्या पाठीशी उभा राहिला यात संशय नाही. त्यांची संगीतावरची अढळ निष्ठा हाच त्यांच्या उत्तुंग यशाचा पाया आहे. चित्रपट संगीत हे मुख्यतः शब्दप्रधान संगीत आहे, चित्रपटातली गीते त्या चित्रपटाच्या कथेविषयी, पात्रांविषयी, पात्रांच्या मनोवस्थेविषयी काही सांगत असतात, हे लतादीदींनी फार लवकर जाणले. आधीचे गायक, अभिनेते, अभिनेत्री पडद्यावर देखील दिसत. पार्श्वगायनाबाबत पडद्यावर दिसणारे आणि गाणारे वेगवेगळे असतात. पडद्यावर दिसणारा प्रसंग, ते गाणे सादर करणारी अभिनेत्री यांचाच नव्हे तर त्या अभिनेत्रीच्या बोलण्याच्या, उच्चाराच्या लकबींचा अभ्यास करून लतादीदी गात राहिल्या. त्यामुळे अनेकदा त्यांचा गान अभिनय अभिनेत्रीच्या अभिनयापेक्षा सरस ठरतो.
‘पाकीजा’मधल्या ‘चलो दिलदार चलो, चांद के पार चलो’ या गाण्यात ‘चांद’ या शब्दाचा मीनाकुमारी जसा उच्चार करत असे तसाच उच्चार लतादीदींनी केला हे वैशिष्ट्य संगीतकार प्यारेलाल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
मानवी जीवनातली कोणतीही भावावस्था अशी नाही जी लतातदीदींच्या आवाजातून प्रकटली नाही. आम्हा सर्वांच्या भावविश्वाला लतादीदींमुळे नादरूप लाभले. काळानुरूप माध्यमे बदलली तरी लता मंगेशकर यांचे गाणे नित्य नूतन राहिले. त्यांचा स्वर, आवाज सर्व नादविश्व, सगळी माध्यमे व्यापून दशांगुळे उरला आहे, नव्हे तो तसाच राहणार आहे. म्हणूनच शरीराने त्या इहलोकीची यात्रा करायला पुढे गेल्या असल्या तरी स्वरांच्या रूपात त्या भारतीय जनमानसात तहहयात असणार आहेत.