Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रआरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा काँग्रेस कार्यसमितीची बैठकीत ठराव मंजूर

आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा काँग्रेस कार्यसमितीची बैठकीत ठराव मंजूर

मुंबई | प्रतिनिधी

हैद्राबाद येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या दोन दिवसीय बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव मंजूर झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळाल्याची माहिती काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी दिली.

- Advertisement -

सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढविणे ही काँग्रेसची ठाम भूमिका असून आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करून संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षण मर्यादा वाढविण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचे चव्हाण म्हणाले.

आरक्षणावरील ५० टक्के कमाल मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील घेतली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये १२७ व्या घटनादुरुस्तीवरील चर्चेत राज्यसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते खरगे, लोकसभेचे काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी, प्रख्यात विधीज्ञ अभिषेक सिंघवी, संजय राऊत, सुप्रिया सुळे, विनायक राऊत, सुरेश धानोरकर, वंदना चव्हाण आदी महाविकास आघाडीच्या अनेक खासदारांनी आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा अडथळा दूर करण्याची मागणी संसदेत प्रभावीपणे मांडली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा मराठा आरक्षण देण्याची भूमिका राज्यसभेत घेतली होती, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढविण्याबाबत काँग्रेस कार्यसमितीने आता ठराव मंजूर करून एकप्रकारे ही पक्षाची ठाम भूमिका असल्याचे अधोरेखित केले आहे. सर्वोच्च न्यायालयातील इंद्रा साहनी आणि अन्य निवाड्यांमधून झालेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा मराठा आरक्षणाच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे. या प्रमुख अडथळ्यावर काँग्रेसने अधिकृतपणे भूमिका घेतली असून, आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करावे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या