उमराणे । वार्ताहर Umrane
उमराणे गावासह परिसरात गेल्या चार-पाच महिन्यापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात घरफोड्यांसह दुचाकी चोरीच्या घटना घडल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काल रात्री हरिओम मैदान परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणार्या पाच जणांच्या टोळीतील एकास ग्रामस्थांनी पाठलाग करीत पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
उमराणे गावासह परिसरात चार-पाच महिन्यात संदीप पोपट देवरे, दिलीप केशव देवरे व नानाजी कारभारी देवरे यांच्या वजन कांट्यावर चोर्या झाल्या तर भाऊसाहेब शिवराम देवरे यांच्या ट्रक मधून बॅटर्या, रघुनाथ देवरे ट्रकमधून दोनशे लिटर डिझेल व 8शेळ्या तर सुभाष मोरे, कल्याण शर्मा, दिलीप दंडगव्हाळ, आदेश जैन, आदींच्या घरी घरफोडया करून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. धनंजय सुधाकर अहिरे, राजेंद्र पोपट देवरे,चिंतामण रामदास ठाकरे आदींच्या दुचाकी लांबवल्याने या चोरट्यांच्या उपद्रवाने ग्रामस्थांनामध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मंगळवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिरामागे कन्हेयालाल महाराज यांच्या पिकअप वाहनाचे कुलूप तोडून वाहन चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांतर्फे केला जात होता तर विजय बुधा देवरे यांना फोन आला की तुमच्या ट्रकजवळ 2 जण उभे आहेत त्यांनी इमारतीवरून बघून भाऊ दादाजी, भाऊसाहेब यांना आजूबाजूला फोन लावले व ग्रामस्थ मित्र जमा केले व चोरट्याना पकडन्यास गेले 5 पैकी 4चोरटे पिकअप वाहनाने पसार झाले, परंतु एक चोरटा मुंबई आग्रा महामार्गांवरील कन्हेया ड्रीपजवळ लपलेला असताना त्यास ग्रामस्थांनी शिताफीने पकडले. या चोरट्याची ग्रामस्थांनी चौकशी केली असता तो मध्यप्रदेश बडवानी येथील असल्याचे सांगत त्याचे नाव प्रवीण आर्या असून या चोरट्यास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली.
गावात चोरटे धुमाकुळ घालत असतांना पोलिसांचे गस्तीपथक दिवसा काय रात्री सुध्दा येत नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला. माजी सरपंच दिलीप देवरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप देवरे यांनी घरीफोड्या करणार्या टोळीचा तात्काळ तपास करून त्यांना पकडत नागरीकांचा चोरीस गेलेला मुद्देमाल मिळवून द्यावा व गावात पोलिसांची संख्या वाढवत रात्रीची गस्त सुरु करावी अशी मागणी केली आहे.