इंदिरानगर | वार्ताहर
पाथर्डी परिसरातील दाढेगाव येथील वालदेवी नदीवरील पूल पावसामुळे पुन्हा एकदा धोकादायक ठरला. आज (शुक्रवारी) दुपारी १२.३० वाजेदरम्यान संसरी गावचे दोन तरुण दुचाकीवरून पाथर्डीकडे जाताना पुलावर आले असता, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते दुचाकीसह वाहून जात होते. मात्र नदीकिनाऱ्या जवळ उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या तत्परतेने वाहून जाणाऱ्या तरुणांना वाचवत मोठा अनर्थ टाळत दोघांचे ही जीव वाचवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या संसरी गावातील संजय बारकू गोडसे (वय १३) हा दुचाकीवरुन पुल पार करत असताना पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे पुलावरुन घसरला आणि नदीत वाहून जात असताना, नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी पाहिले. त्यावेळी गावातील बापू जाधव आणि राजाराम पवार यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या मारल्या व गोडसे याला पाण्यातून बाहेर काढले. तर दुसऱ्या तरुणास ग्रामस्थांनी दोर टाकून चार-पाच जणांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी प्रथमोपचार दिले.
दरम्यान, बचाव मोहिमेदरम्यान राजाराम पवार हेही पाण्याच्या भोवऱ्यात अडकले होते. काही वेळ जीवघेणा प्रसंग ओढवूनही ते सुखरूप बाहेर आले. या घटनेत जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना तातडीने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धोकादायक पूल, जीवघेणा मार्ग
पावसाळ्यात दाढेगाव-वालदेवी नदीवरील पूल धोकादायक ठरत आहे. या मार्गावरून गावकरी, शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग दररोज प्रवास करत असतात. याआधीही या ठिकाणी दुर्घटना घडल्या असून, काहींना जीव गमवावा लागला आहे. तसेच जनावरेही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
देवळालीच्या आमदार सरोज आहिरे आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी याआधी या पुलाचा दौरा करून ग्रामस्थांना नवीन पूल उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांची मागणी
या पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने अपघातांची शक्यता कायम असते. याबाबत प्रतिक्रिया देताना दाढेगावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुश भोर म्हणाले, “आज दोघांचे प्राण वाचले ते ग्रामस्थ उपस्थित असल्यामुळे. मात्र उद्या असेच प्रसंग घडून कोणाचे तरी जीव गेले तर जबाबदार कोण? आमदार व मनपा आयुक्तांनी आश्वासन देऊनही पूल उभारणीचे काम झालेले नाही. त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात घालण्याआधी कायमस्वरूपी पूल उभा राहावा, हीच मागणी आहे.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





