सध्या वेब वाहिन्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. म्हणूनच या वाहिन्यांचे सदस्यत्व घेणार्यांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदवली जात आहे. नव्याने प्रदर्शित झालेल्या वेबसीरिज वेब वाहिन्यांच्या लोकप्रियतेत भर घालत आहेत. जगभरातच विविध वेबसीरिजची प्रेक्षक संख्या विक्रमी आकडा गाठत आहे. वेब वाहिन्या हा मनोरंजनाचा समर्थ पर्याय म्हणून समोर आला आहे.
वाहिन्यांच्या सदस्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसते आहे. इंग्रजीसोबतच हिंदी वेब वाहिन्यांनीही बरीच लोकप्रियता मिळवल्याचे दिसून येत आहे. हिंदीतही वैविध्यपूर्ण विषयांवरील वेबसीरिज दाखल होत असल्यामुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता टिकून राहते. विनोदी, थरारक, गुन्हेगारी जगतावर आधारित वेेबसीरिजची गेल्या वर्षभरात चलती होती. ‘तब्बर’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘तब्बर’ ही एक कौटुंबिक वेबसीरिज असून आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असणार्या कुटुंबाची कथा यात पाहायला मिळाली.
पवन मल्होत्रा आणि सुप्रिया पाठक यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. मालिकेची अखेर खूपच सुरेख होती. निराळाच संदेश देणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. ‘गुल्लक’ हीसुद्धा अशीच एक सरळ आणि साधी वेबसीरिज. कुटुंबासह बघता येणार्या या सीरिजचा दुसरा हंगाम सादर करण्यात आला. ‘द फॅमिली मॅन 2’ हीसुद्धा गेल्या वर्षात गाजलेली वेबसीरिज. मनोज वाजपेयी आणि सॅमंथा रूथ प्रभू यांच्यासह अन्य कलाकारांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका चांगलाच भाव खाऊन गेली. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ‘मुंबई डायरीज 26/11’ ही वेबसीरिज चांगलीच गाजली.
या सीरिजमध्ये मोहित रैनाची प्रमुख भूमिका असून त्याला अन्य कलाकारांची चांगली साथ मिळाली आहे. यूट्यूबवरील ‘अॅस्पिरंटस’् या सीरिजलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजमध्ये संवेदनशीलता ठासून भरलेली आहे. ‘ग्रहण’ वेबसीरिजमध्ये 1984 मधल्या कठीण काळात फुललेल्या प्रेमाची कथा सांगण्यात आली आहे. या सीरिजमधले अंशुमन पुष्करचे काम खूप गाजले. त्यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुकही झाले. ‘द कोटा फॅक्टरी’ हीसुद्धा एक गाजलेली वेबसीरिज.
या सीरिजचा पहिला हंगाम गाजल्यानंतर दुसर्या हंगामाची चर्चा सुरू झाली. कोटा फॅक्टरीमध्ये भारतातल्या युवा वर्गाचे विश्व दाखवण्यात आले आहे. अशा या वेबसीरिज प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहेत. प्रेक्षकांना अपेक्षित असे सगळेच या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळते. सर्वच स्तरातल्या आणि वयोगटातल्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वेबसीरिज सादर होत असल्यामुळे त्यांना लोकाश्रयही मिळताना दिसतो आहे. तसेच या सीरिज कुठेही बघता येतात. लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईलवर अगदी हवे तेव्हा या सीरिज पाहता येतात. म्हणूनच या सीरिजना तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.