Monday, July 22, 2024
Homeभविष्यवेधघरजावई योग !

घरजावई योग !

हस्तसामुद्रिकशास्त्र हे जुजबी शास्त्र आहे, या शास्त्रात कालगणना किंवा कालनिर्णय होत नाही किंवा करता येत नाही या समजामुळे हस्तशास्त्रातील अभ्यासकांची रुची वाढली नाही असे मी मानतो. हस्तसामुद्रिकशास्त्राबद्दलच्या जुजबी ज्ञान असलेले भ्रामक कल्पनेने ग्रासलेले अभ्यासक स्वतःच्या नांवापुढे सामुद्रिकशास्त्राची पदवी लावण्यात भूषण मानतात.

- Advertisement -

जातकाच्या प्रश्नांची उत्तरे किंवा शंका समाधान अवगत असलेल्या विविध गूढ अभ्यासाद्वारे सांगून झाले की, बघू तुमचा हात काय म्हणतो म्हणून जातकाचा जाता जाता हातावरून नजर मारून ;हो मी सांगितल्या प्रमाणे हस्त रेषा सुद्धा तेच सांगत आहेत अशी छाती ठोक बतावणी करून स्वतःचे समाधान व जातकावर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात. तोंडी लावण्यासाठी हस्तसामुद्रिकशास्त्राचा उपयोग करणे म्हणजे त्या शास्त्राची अवहेलना आहे. हस्तसामुद्रिक शास्त्र खूप पुरातन आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या शास्त्रा द्वारे अचूक काल निर्णय सांगता येतो परंतु त्यासाठी हे शास्त्र समजावून घेणे गरजेचे आहे. हस्त सामुद्रिक शास्त्रात डाव्या व उजव्या हातावरील रेषा ग्रह व चिन्हे ही कधीही सारखी आढळत नाही किंवा नसतात. तरी पण डाव्या व उजव्या हातावरील रेषा,ग्रह,चिन्ह यांचा एकत्रित अभ्यास करूनच निर्णय करावा लागतो.

हस्तसामुद्रिक हे संपूर्ण हात, हाताचा व बोटांचा आकार, त्यावरील ठसे, पेरे, नखे, हाताची त्वचा, त्वचेचा रंग व विशेषतः अंगठा, अंगठ्याचा अभ्यास, हातावरील ग्रह, रेषा, चिन्हे हे महत्वाचे आहेत. कुंडलीशास्त्रात व पंचांगाच्या आधारे खगोलीय घटना, ग्रह यांचे भ्रमण त्यांचा दिवस वेळ अचूक काढता येतो. परंतू तळहातावरील असलेल्या ग्रहांचे भ्रमण काढता येत नाही. सर्वात अवघड असलेली गोष्ट ही की, हस्तसामुद्रिकशास्त्रात राहू केतूला स्थान नाही आणि राहू केतूच्या भ्रमणावरून नव्वद टक्के ज्योतिषी भाकीते करतात, किंवा भाकीत कथन करतात राहू केतूचा आधार घेतात.

जुळ्या तिळ्यांच्या जन्म वेळेत एक ते तीन मिनिटांचा फरक असला तरी जन्म कुंडलीत फक्त कला विकलांचा फरक दिसून येतो. जुळ्या तिळ्यांचे भाग्य एकसारखे नसते त्यांच्या हातावरील ठसे, रेषा, ग्रह,चिन्ह, हाताचा आकार यात साम्य असत नाही, म्हणूनच त्यांचे भाग्यही एकसारखे असत नाही. हस्तसामुद्रिकशास्त्रात डाव्या व उजव्या दोन्ही हातांचा संपूर्ण अभ्यास आहे, बोटांच्या नखाच्या बाजूकडील (तळहातावर नव्हे) एखाद्या बोटावर जर तीळ असेल तरी त्या तिळाचे अशुभ परिमाण व्यक्तीच्या वाट्याला येतात असा माझा अनुभव आहे. एखादा तीळ जो बोटाच्या वरून आहे त्याच्या हातावर असण्याने,किंवा येण्या जाण्याने किंवा गडद फिका होण्याने व्यक्तीच्या आयुष्यात परिणाम घडविण्यास कारणीभूत ठरतो. मनुष्याच्या जीवनाला आकार देण्याचे कार्य त्याच्या हातावरील ग्रह,रेषा,चिन्हे व हातांचे विविध आकार याद्वारे निश्चित होते. डाव्या व उजव्या हातावरील ग्रह रेषा व चिन्ह यांचे मिळून मनुष्याच्या आयुष्यात निरनिराळे योग असतात, हे योग सुखकारक व दुःखकारकही असतात. व्यक्तीच्या जीवनात दोन्ही हातावरील रेषा, रेषे बरोबरच हातांचा व बोटांचा आकार व त्यामधील असलेल्या विविधतेमुळे स्वभाव, एकंदरीत व्यक्तिमत्व, मन, कल्पना, अभिव्यक्ती,सुख दुःख याबरोबरच व्यक्ती त्याचे जीवन कश्याप्रकारे व्यतीत करेल याचा संपूर्ण आयुष्याचा आराखडा दोन्ही हातावर असतो.

एखाद्या व्यक्तीचे मन कसे आहे त्याच्या भाव, भावना कश्या आहेत, त्याच्या स्वार्थी भाव आहे की, तो निःस्वार्थी आहे की व्यवहारी आहे हे हस्तरेषांवरून ओळखता येत. व्यतीच्या हातावरील शुभ अशुभ ग्रह हे त्या व्यतीची विविध क्षेत्रातील असलेली कमी जास्त प्रमाणात असलेली हुशारी, धारणा, कृती व आयुष्यातील महत्वाचे निर्णय ती व्यक्ती घेत असते. हातावरील सप्त ग्रहांपैकी जो ग्रह बलवान असेल त्या ग्रहाच्या अधिपत्याखाली व्यक्ती त्याच्या जीवनातील पन्नास टक्के निर्णय घेत असते, बाकीचे पन्नास टक्के निर्णय हे इतर ग्रहांच्या प्रभावाखाली होत असतात. आज आपण घरजावई योगाच्या दोनही हातांचा भविष्यवेध पहाणार आहोत.

जातकाचा डावा हात

डाव्या हातावरील हृदय रेषा सरळ आहे, ती कमानदार नसल्याने मनात स्वार्थी भाव आहेत, हृदय रेषेतून मस्तक रेषेकडे जाणारे एकूण सहा रेषांचे फाटे आहेत. हे हृदय रेषेवरील मस्तक रेषेच्या दिशेने खाली जाणारे फाटे प्रेम भावनेचे आहेत. डाव्या हातावरील या उपजत प्रेम भावनेमुळे माझा जातकाची श्रीमंत मुलींशी प्रेमप्रकरणे झाली व ती फक्त श्रीमंत मुलींशी झाल्याने जातकाचा स्वार्थी भाव प्रगट होतो. माझा जातक अमीरखान सारखा दिसायचा नव्हे तर तो त्याच्या पेक्ष्या जास्त स्मार्ट दिसायचा, अमीरपेक्षा उंची माझ्या जातकाची जास्त आहे त्यामुळे त्याच्या प्रेमात ललना पडत असत. उपजत सौदर्य हे वाड वडिलांकडून येत असले तरी, जातकाचा दोनही हातावरचा शुक्र उत्तम असल्याने जातकास कसा पेहेराव करावा, कसे टाप टीप राहावे हे उपजत आलेले आहे, त्यामुळे त्याचे बोलणे, चालणे अदा यासुद्धा अमीरखानसारख्या होत्या.

डाव्या हातावरची आयुष्य रेषा वय वर्ष 65 पर्यंत आहे व त्याच्याच शेजारी भाग्य रेषा मणि बंधाकडून उगम पाऊन मस्तक रेषेपर्यन्त सरळ व नंतर तुटक तुटक होऊन शनी ग्रहाकडे गेली आहे. ही भाग्य रेषा जातकाच्या वय वर्ष 15 पासून शुभ झाल्याने त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे ती संकेत देते. मस्तक रेषा तिरकी होऊन चंद्र ग्रहावर सरळ उतरली आहे त्यामुळे जातक प्रेमात यशस्वी होत गेला त्याचे व्यक्तिमत्वातील बोल बच्चन व रोमँटिकपणा मस्तक रेषेने प्रदान केला आहे. अंगठा मजबूत आहे त्यामुळे त्याच्या जीवनातली दिशा व ध्येय स्पष्ट आहे व त्यादृष्टीने त्याचा संकल्प आहे. हातावरील गुरुचे बोट जाड आहे त्यामुळे त्याचेकडे महत्वाकाक्षा आहे व त्यादृष्टीने त्याने त्याच्या जीवनातील वाटचाल निवडली आहे. हातावर आयुष्य रेषेच्या बरोबरीने 20 व्या वय वर्षात उगम पावलेली मंगळ रेषा वय वर्ष 65 पर्यंत आहे, त्यामुळे जातक वय वर्ष 65 पर्यन्त उत्साहित व क्रियाशील राहणार आहे. विवाह रेषा वय वर्ष 35 नंतर उत्तम आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य वय वर्ष 35 नंतरच प्राप्त आहे.

प्रारब्धाचा उजवा हात

डाव्या हातावरच्या हृदय रेषेने व्यावहारिक प्रेम केले, ते व्यावहारिक आहे कारण त्याने प्रेम केले ते कोट्याधीश मुलींशीच, सरतेशेवटी त्याचा विवाह भारतातही त्या वेळेस नावाजलेल्या उद्योगपतीच्या मुलीशी झाला. हा विवाह आंतरधर्मीय होता,तरीसुद्धा मुलीने त्यास मान्यता देऊन प्रेमापोटी लग्न गाठ बांधली. माझा जातक घरजावई झाला नंतर, ज्याच्याकडे स्कूटर नव्हती तो बी एम डब्लू कारने फिरायला लागला. उद्योगपती नीता अंबानी यासुद्धा लग्नानंतर अब्जोपती झाल्या. या दोघांमधील फरक हा कि नीता ह्या आपल्या पतीमुळे ऐश्वर्यवंत झाल्या, आणि माझा जातक त्याच्या पत्नीमुळे श्रीमंत झाला. माझा जातक घरजावई म्हणून पत्नीच्या घरी राहायला गेला व कारभारी झाला. नीता यांना पतीच्या संपत्तीत वाटा मिळाला व माझा जातक पत्नीच्या संपत्तीचा रखवाला झाला. माझ्या जातकाच्या उजव्या हातावरची भाग्य रेषा शुक्र ग्रहाच्या तळातून म्हणजे मनगटापासून उगम पावते आहे व ती आयुष्य रेषेला छेद देऊन शनी ग्रहावर अखंड जाऊन थांबली आहे. या शुक्र- शनी योगामुळे, शुक्राने भौतिक ऐश्वर्य बहाल केले व शनी ग्रहाने आर्थिक चिंतेतून मुक्त केले.

उजव्या हातावरील भाग्य रेषा शुक्र ग्रहाच्या तळातून उगम पावल्याने आयते भौतिक ऐश्वर्य प्राप्त झाले. आयुष्य रेषेच्या आतून शुक्र ग्रहावरून एखादी रेषा हातावरील भाग्य रेषेत जरी जाऊन मिळाली, तरी वाड वडिलांच्या संपत्तीत वाटा निश्चित मिळतो. तसेच भाग्य रेषा आयुष्य रेषेच्या आत थोडीशी जरी असेल व तेथून भाग्य रेषेचा उगम होत असेल तरीही आयुष्य रेषेच्या आतील शुक्र ग्रह आर्थिक बाबी सुखकर करतो, सुखवस्तूचा लाभ देतो. माझ्या जातकाचा डावा व उजव्या हातावरील ग्रह,रेषा, बोटांची ठेवण वेगळी आहे, डाव्या हाताने प्रेमप्रकरण करायला लावले, ते यशस्वी झाले व उजव्या हातावरील भाग्य रेषेने ऐश्वर्य दिले. डाव्या हातावर रवी रेषा नाही व उजव्या हातावर हृदय रेषेच्या वर म्हणजे वय वर्ष 55 च्या पुढे रवी रेषा आहे ती सुद्धा वक्र आहे. त्या मुळे माझ्या जातकाला समाजात व त्याच्या पत्नीकडे कुटुंबात

मान, सन्मान व किंमत नाही. वय वर्ष 55 च्या पुढे मान सन्मान मिळण्याचे योग् आहेत त्या आधीच्या वयात नाही. उजव्या हातावरील गुरु बोट शनीकडे खेचले गेल्याने माझा जातक आयुष्यभर माझे काय? या चिंतेत राहणार आहे आणि ते खरेही आहे. माझ्या जातकाची पत्नी व पत्नीची आई जोपर्यन्त जिवंत आहे तोपर्यन्त जातक कुठल्याही संपत्तीचा मालक होऊ शकत नाही तसे त्याच्या हातावर कुठलीही निशाणी नाही, त्याला त्याच्या कामात केलेल्या किंवा खर्चाचा हिशोब नियमित द्यावा लागतो.

घरजावई तोही बड्या उद्योगपतीच्या घरातला असल्याने माझ्या जातकाला भौतिक सुख सुविधा अपार मिळत आहे किंवा मिळाल्या होत्या असे म्हणू यात. कारण हा जातक 2009 साली माझेकडे आला होता त्याच्या आधी तीन वर्ष त्याचा प्रेम विवाह होऊन तो घरजावई झाला होता. माझा जातक घर जावई झाला कारण त्याच्या पत्नीला सख्खा भाऊ नव्हता. पत्नी परदेशात मोठ्या कंपनीत काम करीत होती व सासरे नुकतेच स्वर्गवासी झाले होते. माझ्या जातकाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे व पत्नीच्या घरी जावबदारीने कंपनीचे काम पाहणारे कोणीही नसल्याने तो घरजावई झाला.

येथे माझ्या जातकाचे उजव्या हातावरील प्रारब्ध होते कि त्याला शुक्र ग्रह ऐश्वर्य देणार होता, त्यासाठी नियतीने त्याचा घरजावई होणाच्या मार्ग मोकळा केला. माझ्या जातकाला अजून तरी संपत्तीत वाटा मिळाला नसला तरी तो भौतिक ऐश्वर्य उपभागतो आहे, पत्नीच्या संपत्तीचा रखवाला म्हणून काम करीत आहे.नाहीतरी हा देह ठेवल्यानंतर संपत्ती तुमच्या बरोबर कुठे येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या