Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधजीवनातील उत्कर्षाचे योग!

जीवनातील उत्कर्षाचे योग!

आयुष्य रेषेवरच्या उत्कर्ष रेषा बाणाने दाखविल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्यात उत्कर्ष कधी किती व कसा राहील याबद्दल चिंता असते. आयुष्यातील उत्कर्ष म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील यश होय. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशासाठी धडपडत असते. उत्कर्ष साधण्यासाठी नोकरीत असो व व्यवसायात व्यक्ती प्रयत्नशील असते, त्यासाठी मेहनत घेत असते. परंतु प्रत्येक व्यक्तीजीच्या आयुष्यात उत्कर्ष हा नियतीने ठरवलेला असतो. हा उत्कर्षाचा लाभ नियती कधी देणार, देणार कि नाही हे हातावरच्या आयुष्य रेषेतून निघणार्‍या उत्कर्ष रेषेवरून अचूक कालनिर्णय करता येतो.

आयुष्यातील छोटे मोठे उत्कर्ष व आयुष्यातील सर्वात मोठा उत्कर्ष कधी याचा सुद्धा अचूक कालनिर्णय करता येतो. नोकरी करीत असताना बढती कधी मिळेल,व्यापार करताना व्यवसायात वृद्धी कधी होईल, राजकारणी, पुढारी, नेतृत्व करणार्‍या मंडळींना मोठे पद कधी मिळेल, इत्यादी अनेक क्षेत्रातील व्यक्तीच्या आयुष्यातील उत्कर्षांचा कालखंड सांगता येतो व तो अगदी अचूक असतो. व्यवसाय, नोकरी, व्यापार, पुढारी, यांचेबरोबरच ज्या गृहिणी प्रत्यक्ष कमवीत नाहीत, किंवा त्यांची आर्थिक कमाई नसते अशा महिलांच्या आयुष्यात सुद्धा उत्कर्ष असतो.

- Advertisement -

घरकाम करणार्‍या महिलांच्या हातावरही उत्कर्ष असतो. पण त्याचा अर्थ आर्थिक क्षेत्रातील नसून घरातून, परिवारातून त्यांच्या मान सन्मानात वृद्धी होते. उत्कर्षाचा अर्थ फक्त आर्थिक कारणासाठी नसून त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याला मिळणारा किंवा मिळत राहणारा मान सन्मान असतो. घर व मुले सांभाळून नेटाने संसार करणार्‍या महिलांना त्यांच्या आयुष्यात क्रेडिट दिले जाते. हे क्रेडिट म्हणजेच मान सन्मान होय. महत्वाच्या निर्णयात कुटुंबातील महिलांचा किंवा महिलेचा विचार किंवा तिचे काय मत आहे हे जेव्हा विचारले जाते त्यावेळेस त्या महिलेच्या हातावरील उत्कर्ष रेषा काम करते. थोडक्यात कुटुंबात एखाद्या महिलेचे मत विचारात घेतले जाते तेव्हा तिचे महत्व अधोलीखीत होते आणि त्या वय वर्षात घरकाम करणारी महिला का असेना तिच्या हातावर उत्कर्ष रेषा पाहावयास मिळते. पतीच्या उत्कर्षाचा फायदा पत्नीला होत असतो, पतीच्या उत्कर्षात पत्नीचा वाटा हा मोठा असतोच तो कुठल्याही क्षेत्रातील असो, समाजात, कुटुंबात, परिवारात पतीच्या उत्कर्षात पत्नीही भाव खाऊन जाते.

काही व्यतींच्या जीवनात उत्कर्षाचा अभाव असतो, काहींना उत्कर्षाचा लाभ उतार वयात मिळतो, काहींना आयुष्यभर मिळत नाही हा सर्व नशिबाचा भाग आहे. खेळाडू, अभिनेता व अभिनेत्री यांचा उत्कर्ष 30 वर्षांच्या आत असावा लागतो. नाहीतर त्यांना जन्मभर परत संधी असत नाही. काही व्यवसाय असे आहेत कि ज्यात त्या त्या वय वर्षात हातावर उत्कर्ष असावा

लागतो. अन्यथा त्या व्यवसायाच्या पाठीमागे लागू नये असा सल्ला जातकांना नेहमी देत असतो. खूप उशिराने वय वाढल्यानंतर अभिनयात उत्कर्षाचा काळ असेल तर तरुणपणी खूप हाल सोसावे लागतात. हल्ली शाळेतील मुलांना 20-20 क्रिकेटचा झगमगाट पाहून क्रिकेट खेळात करियर करण्याची मनीषा असते. बर्‍याच मुलांचे पालक माझ्याकडे क्रिकेट खेळात करियर केले तर यश मिळेल का याची खात्री करण्यासाठी मुलांना घेऊन येत असतात. परंतु कोणत्याही मैदानी खेळात शारीरिक क्षमतेबरोबरच उत्कर्ष वय वर्ष 30 पर्यंत आहे का? हे पाहूनच करियर करण्याचा सल्ला देत असतो. या करियरबाबत सल्ला देताना मुलांच्या हाताच्या बोटांवरील ठशांचे कारकत्व सुद्धा विचारात घ्यावे लागते. कारण बोटांचे ठसे उपजत कलागुण दाखवीत असतात. तरुण मुले मुली सुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवतात, एखाद्या दुसर्‍या मालिकेत त्या दिसतात परंतु परत ते दिसत नाहीत. अशा वेळेस त्यांचा स्ट्रगल चालू असतो व त्यांचा उत्कर्षाचा काळ असत नाही.

हस्तसामुद्रिक फक्त ज्योतिष प्रश्नासाठी मर्यादित नसून ते तर संपूर्ण आयुष्यातील घटनाक्रमाचे मार्गदर्शन करत असते. हेही तितकेच खरे कि अडचणी, समस्या आल्याशिवाय व त्या जेव्हा सुटत नाहीत हे लक्षात आल्याशिवाय कोणीही याकडे वळत नाही. ज्यांच्या आयुष्यात उत्कर्ष दर दोन तीन वर्षांनी आहे असे लोक आपल्या बुद्धिमत्तेवर, निर्णयावर व मनगटावर विश्वास ठेवतात त्यांना ज्योतिष मिथ्या वाटते आणि असे वाटणे सहाजिकच आहे. या मंडळींना ज्योतिष थोतांड वाटत असले तरी, त्यांच्या मुलांचे लग्न जमविताना ते कुंडली तील एकूण जुळणारे गुण पाहतात, कार्य सिद्धीस जाण्यासाठी दिवस व मुहूर्त यासाठी सल्ला घेतात.

उत्कर्ष रेषा

आयुष्य रेषा पहिल्या बोटाखाली म्हणजे गुरु ग्रहापासून अंगठ्याच्या आत उगम पावते व ती थेट खालचा मंगळ व शुक्र ग्रहाला वळसा घालून मणिबंधपर्यंत जाऊन थांबते. आयुष्य रेषा त्या व्यक्तीच्या जीवनातील विविध कालखंडात त्याच्या आयुष्यात घडणार्‍या घटना तपशीलवार दाखविते. यात व्यक्तीच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या उत्कर्षाचा कालखंड उत्कर्ष रेषेने अंकित केलेला असतो. आयुष्य रेषेवर उत्कर्षाच्या कालखंडा व्यतीरिक्त आरोग्याची स्थिती, आजारपण व एकंदरितच व्यक्तीच्या शारीरिक सामर्थ्याची स्थिती यांची माहिती मिळते. आयुष्य रेषा अंगठ्याच्या आत उगमस्थानी शून्य वर्षाची धरून ती मणिबंधापर्यंत एकूण शंभर वय वर्षाची गणना करता येते.

आयुष्य रेषेतून फांदीला कोंब फुटावेत त्याप्रमाणे बोटांकडे जाणार्‍या बारीक पातळ तलम छोट्या छोट्या रेषा ह्या उत्कर्ष रेषा असतात. या उत्कर्ष रेषा महत्त्वाकांक्षा, यश, इच्छा आकांशा सफल होण्याचा काळ दर्शवितात. व्यक्तीच्या जीवनातील उत्कर्षाचा कालखंड सर्वात उत्तम व समाधान देणारा असतो. आयुष्य रेषेतून सर्वात मोठी उत्कर्ष रेषा व्यक्तीच्या जीवनातील सर्वात उत्तम कालखंड असतो या कालखंडात ती व्यक्ती सर्वोच्चपदी मान सन्मान व उत्कर्षाचा धनी होते. आयुष्य रेषेतून खाली मणिबंधाकडे जाणार्‍या रेषा असतात त्या वय वर्षात जीवनशक्ती, महत्वाकांक्षा, क्षमता, यांचा र्‍हास होतो किंवा आजारपण, शारीरिक पीडा असल्यामुळे जीवनात उत्साह असत नाही.

उत्कर्षाच्या बारीक तलम रेषा असू शकतात. त्या साध्या डोळ्याने कदाचित दिसू शकत नाहीत. परंतु भिंगाचा वापर केला तर या उत्कर्ष रेषा आयुष्य रेषेवर दिसून येतील. एखादी उत्कर्षाची रेषा थेट शनी ग्रहावर जाऊन थांबत असेल तर ती रेषा भाग्य रेषेचे काम करते, ज्या वय वर्षात भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावलेली असते त्या वय वर्षाचा आधीच किमान चार पाच वर्षाचा कालखंड प्रगतीचा गेलेला असतो. व्यक्तीच्या जीवनात अचानक उत्कर्ष कोट्यवधी लोकात एखादा असतो, जसे कि खूप मोठे लॉटरीचे तिकीट लागले. अब्जाधीशाशी विवाह झाला, अथवा दूरच्या नातेवाईकाची वारसा हक्काने संपत्ती प्राप्त झाली कि अचानक उत्कर्ष संभवतो. परंतु ज्या वय वर्षात उत्कर्ष मोठा असतो त्या आधी चार पाच वर्षांचा कालखंड उत्तम गेलेला असतो व त्यांना नंतर मोठा उत्कर्ष होतो. एका रात्रीतून उत्कर्ष होत नाही, मी एखाद्याचे भाकीत केले कि वयाच्या बत्तिसाव्या वर्षी मोठा उत्कर्ष आहे त्या वेळेस रात्री वाढदिवसाचा केक कापला व सकाळी उठल्या उठल्या उत्कर्ष झाला असे होत नाही. व्यक्तीच्या उत्कर्षात त्या व्यक्तीची खूप दिवसांची कठोर मेहेनत, परिश्रम, कामा प्रति आस्था व भाग्याची साथ असावी लागते नाहीतर उत्कर्षाची फळे मिळत नाही. उत्कर्षात दरवेळेस आडवे येणारे लोक किंवा घटना घडत असतात, उत्कर्ष किंवा बढती अगदी मिळणारच याची खात्री असताना सुद्धा बढती मिळत नाही.

ज्या व्यक्तींच्या हातावर भाग्य रेषा व रवी रेषा अति उत्तम असते त्यावेळेस सदा सर्वकाळ त्यांच्या आयुष्यात उत्तरोत्तर उत्कर्ष होत असतो. कारण रवी रेषा मान सन्मान, कीर्ती प्रसिद्धी देते व भाग्य रेषा ऐश्वर्य देत असते अशा वेळेस या भाग्यवान व्यक्ती समाजात वंदनीय असतात. या व्यक्तीच्या हातावरील आयुष्य रेषेवर उत्कर्ष रेषेचा अभाव असली तरी, भाग्य रेषा व रवी रेषा त्या व्यक्तीच्या आयुष्यात कायम उत्कर्षाचे योग जुळवून आणतात.

तसेच ज्यांच्या आयुष्य रेषेवर एकही उत्कर्षाची रेषा नसेल तर त्यांच्या हातावरील भाग्यरेषा व रवी रेषा ज्या प्रतीची असेल म्हणजे,सामान्य, बेताचीच किंवा मध्यम आर्थिक परिस्थिती असेल तर त्या त्या प्रमाणात त्यांच्या आयुष्यातही संथपणे उत्कर्ष असतो किंवा पूर्वीपेक्षा बरे दिवस आहेत असे मानतात. हातावर उत्कर्ष रेषा असतात अशा व्यक्ती त्या वय वर्षात निश्चितच त्यांच्या क्षेत्रात पुढे जातात किंवा नाव कमावतात. आयुष्य रेषेतून गुरु ग्रहावर म्हणजे पहिल्या बोटाच्या खाली एखादी रेषा जाऊन थांबत असेल तर ती व्यक्ती तिच्या आयुष्यात जे नशिबी आले त्याच्याशी लढा देत झगडत आयुष्याच्या उतार वयात प्राप्त परिस्थीतीवर मात करून जे भाग्याने दिले त्यात समाधान मानते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या