नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी
मकरसंक्रांतीच्या (Makar Sankrant) निमित्ताने शहरात प्रतिवर्षी साजरा होणारा पतंगोत्सव (kite festival) उत्साहात पार पडला. यानिमित्त पतंगप्रेमींच्या उत्साहाला अक्षरशः उधान आलेले होते. डीजेच्या तालावर युवकांकडून होणार्या जल्लोषाने पूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले होते. यावेळी बर्याच ठिकाणी वेड चित्रपटाचे गाणे व आई झुमकावाली पोर या गाण्यावर तरुण, तरुणींसह महिलांमध्ये जोश संचारला होता. पहाटे 5 वाजेपासून शहरात गाणे, ढोलताशांचा निनाद सुरु होता. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात, गच्चीवर महिलांसह आबालवृद्धांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत हा उत्साह कायम होता.
पौष महिन्यात हिंदुबांधवांचा मकरसंक्रांत हा मोठा सण असतो. हा सण म्हणजे प्रेम, सामंजस्य, परस्पर सद्भावना यांचा दिव्य संदेश देतो. त्यामुळे या दिवसाला धार्मिक व भौगोलिक महत्व आहे. पृथ्वीच्या मकरवृत्तावरुन सूर्याचा उत्तरेकडे कर्कवृत्ताच्या दिशेने प्रवास मकरसंक्रांतीपासूनच सुरु होत असतो. मकरसंक्रांतीपासून सूर्याचे पृथ्वीसापेक्ष उत्तरायण सुरु होते. हा ॠतूबदलाचा किंवा संक्रमणाचा काळ आहे. म्हणूनच या दिवसाला मकरसंक्रांत म्हणून ओळखले जाते.
तिळगुळ देवून अमंगल गोष्टींचा नाश होऊन मांगल्याचा, प्रेमाचा संदेश लोक देतात. हा सण म्हणजे मनातील किल्मिष, गैरसमज आणि मानसामानसातील दुरावा, कटुता नष्ट करण्याची एक सुसंधीसुद्धा आहे. सद्भावना वाढीस लागून एकोपा निर्माण करण्याची संधी असते. तिर्थस्नानास ह्या दिवशी विशेष महत्व आहे.
नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेला जिल्हा आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील सर्वच सण, उत्सवांचा जिल्हयावर प्रभाव असतो. मग तो नवरात्रौत्सव असो, कृष्ण जन्माष्टमी असो की पतंगोत्सव हे सर्वच सण मोठया उत्साहात नंदुरबार जिल्हयात साजरे केले जातात. मकरसंक्रांतीचा सण गुजरात राज्यात व्यापक स्वरुपात साजरा केला जातो. पतंगोत्सव साजरा करण्यासाठी बालगोपालांची गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी सुरु होती. पतंग उडविण्यासाठी मांजा तयार करण्याची लगबग आठवडयापासून सुरु होती. नंदुरबार जिल्हयात पतंग, मांजा विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. पतंग, मांजा खरेदी करण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत पतंग विक्रेत्यांकडे झुंबड उडाली होती. नंदुरबारात आज पहाटेपासूनच चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण होते.
बालगोपालांसह महिला, तरुण, तरुणींनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात, घराघराच्या गच्चीवर ढोलताशे, डीजेचा निनाद दिवसभर सुरु होता. गच्चीवरच नाश्ता, जेवणाची सोय असल्याने अधिकच उत्साह दिसून आला. यावेळी महिलांसह, तरुण, तरुणींनी पतंग उडविण्यासोबतच नाचण्याचाही मनमुराद आनंद लुटला. एकुणच पतंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
अक्कलकुवा शहरात कायपो छे चा आवाज गुंजला
अक्कलकुवा शहरात दिवसभर कायपो छे चा आवाज गुंजला असुन मोठ्या उत्साहात शहरात पतंगोत्सव साजरा करण्यात आला.
सकाळ पासून पतंग उडवन्यचा आनंद घेऊ लागले . पतंग प्रेमींनी घराच्या गच्चींवर, उंच टेकडीवर एकच गर्दी करीत पंतग उडविण्याचा आनंद साजरा केला. हजारो रंगबेरंगी पतंगांनी दुपारनंतर आकाश व्यापले होते. ठिकठिकाणी ध्वनीक्षेपक लावून पतंग उडविण्याचा आनंद घेतला जात होता. सायंकाळी सूर्यास्तानंतर दिव्याचे पतंग देखील आकाशात ठिकठिकाणी दिसून येत होते. पहाटे चार वाजेपासून डीजेच्या कानठळ्या बसवणार्या आवाजावर पतंग उडविण्यास युवकांनी सुरुवात केली. त्यामुळे आकाश रंगबेरंगी पतंगांनी व्यापून गेले होते. रात्री उशिरापर्यंत हा उत्साह कायम होता.रात्रीही काही हौसी पतंगप्रेमींनी दिव्याचे मिणमिणते पतंग उडविण्याची हौैसही भागवून घेतलीच.