Sunday, September 29, 2024
HomeधुळेCrime धुळ्यात स्वर्ण पॅलेसमध्ये चोरी ; एक कोटी 10 लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime धुळ्यात स्वर्ण पॅलेसमध्ये चोरी ; एक कोटी 10 लाखांचा मुद्देमाल लंपास

धुळे । प्रतिनिधी dhule

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आहे.तरी चोरट्यांनी आग्रारोडवरील बॉम्बे लॉज शेजारी असलेले स्वर्ण पॅलेसमध्ये धाडसी चोरी केली. चोरट्यांनी दुकानातील एक कोटी 10 लाखांचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले. गस्तीवरील पथकाला शटरचे कुलूप तुटलेले दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

शहरातील आग्रारोडवरील बॉम्बे लॉजच्या शेजारी प्रकाश जोरावरमल चौधरी व सरदार जोरावरमल चौधरी यांचे स्वर्ण पॅलेस हे सोने-चांदीचे दुकान आहे. दुकानाच्या सुरक्षतेसाठी रात्री वॉचमनची नियुक्ती केली आहे. परंतु, काल वॉचमन आपल्या मुलीच्या अ‍ॅडमिशनसाठी पुणे येथे जाणार असल्याने तो सुटीवर होता. याबाबत त्याने सायंकाळी दुकानमालकाला फोन करुन सांगितले होते. एका दिवसाचा प्रश्न असल्याने दुकानमालकाने पर्यायी वॉचमन ठेवला नाही. वॉचमन नसल्याची संधी साधत चोरटे मोटारसायकलीवर ट्रिपलशीट अडीच वाजेच्या सुमारास आले. त्यांनी स्वर्ण पॅलेस या दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी काळे कपडे घातलेले असल्याने व चेहरा झाकलेला असल्याने त्यांच्यावर कुत्रे जोरजोरात भूंकू लागले. तेव्हा कुत्र्यांच्या आवाजामुळे जवळच असलेल्या एका दुकानावरील वॉचमन उठून पाहण्यासाठी आला. त्यावेळी तिघे चोरटे आडोशाला लपले. कोणीच नसल्याची खात्री पटल्याने वॉचमन पुन्हा आपल्या जागी गेला. त्यानंतर चोरटे पाहटे 2.40 वाजेच्या सुमारास दुकानात शिरले.

चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर दुकानातील मुख्य कॅबिनचा काच फोडून ते आत शिरले. यावेळी काचेच्या काऊंटरच्या ब्लॉकमध्ये ठेवलेल 800 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने त्यात वेढे व गिन्नी, 720 ग्रॅम वजनाचे वेगवेगळे दागिने, 10 किलो चांदी व तसेच ड्रॉव्हर तोडून 10 हजार रुपयांची रोकड असा सुमारे एक कोटी 10 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.

एएसपी ऋषिकेश रेड्डी यांनी गस्ती पथकाला वॉचमनसोबत सेल्फी काढण्याचे आदेश यापुर्वीच दिलेले आहेत. त्यानुसार आझादनगर पोलीस ठाण्याचे गस्ती पथक स्वर्ण पॅलेसजवळ आले असता त्यांना स्वर्ण पॅलेस दुकानाजवळून तिघेजण दुचाकीने पळताना दिसले. पथकाने दुकानाच्या शटरकडे पाहिले असता त्यांना स्वर्ण पॅलेसच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. गस्ती पथकाला सदर दुकानात चोरी झाल्याची शंका आल्याने त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याला माहिती दिली. तसेच दुकान मालक प्रकाशराज चौधरी यांना त्वरीत बोलविण्यात आले.

यावेळी दुकानमालकाने दुकानातील व दुकानाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिघे चोरटे कैद झाल्याचे दिसून आले. चोरटे दुचाकीवर ट्रिपल सीट आले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीचे पीआय हेमंत पाटील, आझादनगर पोलीस ठाण्याचे पीआय प्रमोद पाटील, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, पोना रवी राठोड, पंकज खैरमोडे, सुशील शेंडे, मायुस सोनवणे, फॉरेन्सीक लॅबचे धनंजय मोरे, पोहवा पिंटू शिरसाठ, संदीप कढरे, सायबर तज्ज्ञ संजय पाटील, शोध पथकाचे शिरसाठ आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच दुकानमालकाला कोणावर संशय वैगरे आहे का? काय-काय माल चोरीस गेला? याचीही विचारणा केली. याप्रकरणी आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन टी हाऊसच्या बाजूला असलेले स्वर्ण सत्यनारायण ज्वेलर्स या दुककानाच्या बाहेर स्वर्ण पॅलेस ज्वेलर्स यांचे सीसीसीटी कॅमेरे असून त्या कॅमेर्‍याची वायर चोरट्यांनी कापली आहे. आझादनगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकातील कर्मचारी एएसआय शकील शेख, पोकॉ संतोष घुगे, हरिष गोरे, श्री. दराडे हे सराफ बाजारात गस्त घालत असताना त्यांनी दुकानाबाहेर वॉचमनकडे चौकशी करुन ते मार्गस्थ झाले. यावेळी ते आग्रारोडने सायरन वाजवत गजानन टी हाऊसकडे वळाले. यावेळी स्कुटीसारख्या मोटारसायकलवर दोन जण पळताना दिसले. तर एक जण पायी पळताना दिसला. ते तातडीने स्वर्ण पॅलेसच्या वॉचमनकडे गेले असता सदर ठिकाणी स्वर्ण पॅलेसचे मागील बाजूचे शटर उघडे दिसले. जर गस्ती पथक तेथे आले नसते तर वरच्या मजल्यावरील शोरुममधील दागिनेही चोरले असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या