Friday, October 25, 2024
Homeनगरजबरी चोरी करणारी टोळी नेवासा पोलिसांनी केली जेरबंद

जबरी चोरी करणारी टोळी नेवासा पोलिसांनी केली जेरबंद

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

आयशर टेम्पो चालकाला तसेच अन्य एका व्यक्तीस नेवासाफाट्यानजिक मारहाण करुन जबरी चोरी केल्याची घटना घडली. याबाबत नेवासा पोलिसांनी चौघांच्या टोळीला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -

याबाबत अनिकेत कृष्णा सोनगिरे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी साक्षीदार परवेज फकरु शेख याचेसह दि. 15 ऑक्टोबर रोजी शेवगावहून नेवासा फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे आयशर टेम्पो घेऊन जात असताना वाहनचालक परवेज फकरू शेख याला चार इसमांनी पॅसेंजर म्हणून हात केल्याने वाहनचालक व फिर्यादी यांनी त्यांचे वाहन थांबवून वाहनामध्ये बसविले व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने घेऊन जाऊ लागले.

त्याचवेळी या चार इसमांनी फिर्यादी व वाहनचालक यांना मारहाण करण्यास सुरूवात करून फिर्यादी व वाहनचालक यांच्या खिशामध्ये हात घालून पैसे मागू लागले. त्यावेळी सदरचे वाहन हे औदुंबर हॉटेलजवळ थांबवून फिर्यादी व वाहनचालक यांनी त्यास विरोध केला असता, त्यामधील एका इसमाने गाडीतील सिटखालील पाणा काढून फिर्यादीला मारत असताना तो फिर्यादी यांनी हुकविला व तो वाहनचालक परवेज शेख याचे हातावर लागला. त्यानंतर एका इसमाने वाहनचालक परवेज फकरु शेख याचे खिशामध्ये हात घालून त्याचे खिशामधील 10 हजार 600 रुपये तसेच फिर्यादी अनिकेत कृष्णा सोनगिरे यांचे खिशामध्ये हात घालून त्याचे खिशातील त्याचे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांचे खिशामध्ये काहीएक पैसे नसल्याने फिर्यादीस आणखी मारहाण करू लागल्याने त्याने वाहनातून उडी मारून रस्त्याच्या पलीकडील बाजुचे हॉटेल ओमसाईच्या पाठीमागे अंधारात पळून गेले. त्यानंतर वाहनचालक परवेज शेख सुध्दा आयशर टेम्पो घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळून गेला.

त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस मदतीकरिता 112 वर कॉल केला असता, नेवासा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले. फिर्यादीने वरीलप्रमाणे हकीगत सांगून सदरचे चार इसम नेवासा फाट्याच्या दिशेने पायी गेलेले आहे असे सांगितले

त्यावेळी लागलीच चार इसमांचा शोध घेतला असता, सदरचे चार इसम नेवासा फाट्याच्या दिशेने जाताना दिसले असता, त्यावेळी फिर्यादी यांनी सदर इसमांना ओळखले व पोलिसांना सांगितले की, याच इसमांनी आम्हाला मारहाण करून आमचे पैसे, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स घेतलेले आहे, असे सांगितले.

सदरच्या चार इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन नेवासा येथे येण्याच्या अगोदर सदरच्या चार इसमांनी आमच्या अगोदर सोमनाथ दीपक बजागे, रा. पडळवाडी, जि. कोल्हापूर याला सुध्दा नेवासा फाटा येथे मारहाण करून त्याचा वापरता विवो कंपनीचा मोबाईल व खिशामधील सातशे रुपये काढून घेतले होते, असे फिर्यादी यांना समजले.

त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी तसेच साक्षीदार यांचे समक्ष सदर इसमांचे नाव गाव विचारले असता. त्यावेळी त्या चार इसमांनी त्यांची नावे शिवाजी बंडू विटकर रा. नेवासा फाटा, दत्तात्रय ज्ञानेश्वर भुजंग रा. मुकिंदपूर नेवासा फाटा, अमोल पुंजाराम मांजरे रा. झोपडपट्टी नेवासा फाटा, गणेश कचरू भुजंग रा.मुकींदपूर नेवासा फाटा असे सांगितले.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे करत आहेत.

तपासामध्ये आरोपींकडून गुन्ह्यांत चोरलेला विवो कंपनीचा मोबाईल, 700 रुपये रोख व फिर्यादीचे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन जप्त करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस नाईक अशोक लिपने, किरण गायकवाड, संदीप बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप ढाकणे, सुमित करंजकर यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या