लासलगाव । वार्ताहर Lasalgaon
आठ लाखांचा नवा कोरा ट्रॅक्टर ( New Tractor ) घेऊन बाजार समितीत ( APMC ) कांदा लिलावासाठी ( Onion Auction )आलेल्या शेतकर्याचा ट्रॅक्टर रात्री चोरीला गेल्याने संतप्त शेतकर्यांनी सुमारे एक तास बाजार समितीचे मुख्य गेट बंद करून कांदा लिलाव बंद पाडले. दरम्यान, लासलगाव बाजार समिती कर्मचारी व पोलिसांच्या प्रयत्नाने शिवापूर येथे चोरीला गेलेला ट्रॅक्टर मिळाला.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी सुरेश आबाजी काळे (रा.टाकळी विंचूर) यांनी तीन महिन्यांपूर्वी नवीन ट्रॅक्टर घेतला होता. त्या ट्रॅक्टरमध्ये कांदा विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीत आले होते. ट्रॅक्टर रांगेत उभा केलेला असताना अज्ञात व्यक्तीने ट्रॉली तेथेच सोडून फक्त नवीन ट्रॅक्टर बाजार समितीच्या आवारातून चोरून नेल्याचे लक्षात आले.
त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी जोपर्यंत ट्रॅक्टर मिळत नाही तोपर्यंत कांद्याचे लिलाव होऊन दिले जाणार नाहीत अशी भूमिका घेऊन बाजार समितीचा मुख्य दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावले. दरम्यान, बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप,सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,सचिव नरेंद्र वाढवणे यांनी संतप्त शेतकर्यांची भूमिका ऐकून घेऊन कागदपत्राची पूर्तता केल्यास ताबडतोब ट्रॅक्टर मिळवण्यासाठी मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
परंतु त्यानंतरही संतप्त शेतकर्याचे समाधान झाले नसल्याने त्यांनी लेखी स्वरूपात बाजार समितीने लिहून द्यावे व बाजार समितीने चोरीला गेलेला ट्रॅक्टर शोधून द्यावा अशी भूमिका घेतल्यानंतर सुरेश काळे यांच्यासह शेतकर्यांनी मुख्य कार्यालयात जाऊन संबंधितांशी चर्चा केली. तसेच त्यानंतर तब्बल एक तासाने पोलीस व पदाधिकार्यांच्या मध्यस्थीने लिलाव पुन्हा सुरु करण्यात आले. बाजार समिती कर्मचारी व पोलीसानी लासलगाव परिसरात ट्रॅक्टरचा शोध घेत असताना शिवापूर येथे बेवारस स्थितीत ट्रॅक्टर आदळून आला.तो पोलीस ठाण्यात आणून शेतकर्याच्या स्वाधीन करण्यात आला.