मुलांची उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे. सुट्टीचा सुमारे एक महिना अजून बाकी आहे. उन्हाळ्याची मोठी सुट्टी कधी संपेल याची अनेक पालक चातकासारखी वाट पाहात असतात तर सुट्टी कधी संपूच नये अशी मुलांची भावना असते. ‘रोज रोज शाळा पुरे ती आला कंटाळा, चार दिवस आता मनाला कसली ना चिंता, उडू बागडू जशी पाखरे स्वैर अंतराळी’ सुट्टीचे असे वर्णन कवी माधवानुज यांनी केले आहे. तथापि सुट्टीतही मुलांनी पुढील इयत्तेचा थोडा तरी अभ्यास सुरु करावा असे अनेक पालकांना वाटते. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या अलीकडच्या काळात कमी झाल्याचे आढळते. तथापि सुट्टीत केली जाणारी धमालही विद्यार्थ्यांना खूप काही शिकवते. तसेच शाळेतील अभ्यासबाह्य उपक्रमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण होते याची आठवण डॉ. मोहन आगाशे यांनी करून दिली आहे. मोहन आगाशे संवेदनशील कलाकार आणि मानसतज्ञ आहेत. त्यांचा अनुभवाचा सल्ला पालक समजवून घेतील का? शाळेत पारंपरिक अभ्यासबाह्य अनेक उपक्रम राबवले जातात. तथापि मुलांनी त्या वेळेतही अभ्यासच करावा, अशा उपक्रमात भाग घेऊन अभ्यासाचा वेळ वाया घालवू नये असा अनेक पालकांचा अट्टाहास असतो. अभ्यासक्रम मुलांना विषय शिकवतो, त्या विषयाचे ज्ञान देतो. तथापि इतर उप्रक्रम मुलांना जगण्याची कौशल्ये शिकवतात. खेळातून खिलाडूवृत्ती विकसित होते. साहसी प्रकारातून मुलांना त्यांच्या क्षमता आणि मर्यादा समजतात. वाचन समतोल दृष्टिकोन प्रदान करते. विविध स्पर्धांमधील सहभागातून मुले जय आणि पराजय सहज स्वीकारायला शिकतात. उन्हाळ्याची सुट्टीही त्याला अपवाद नसावी. पूर्वी मुले सुट्टीत धमाल खेळ खेळायची. मामाच्या गावाला जायची. मुलींची भातुकली रंगायची. यातूनच मुले अनेक कौशल्ये त्यांच्याही नकळत शिकायची. पाहुणे म्हणून कोणाकडे गेल्यावर कसे वागायचे, ताटात जे पदार्थ वाढले जातील ते सगळे खायचे, आवडनिवड सांगायची नाही, सकाळी लवकर उठायचं, हट्ट करायचा नाही असे अनेक संस्कार मुलांवर व्हायचे. अशा गोष्टी मुलांना वेगळ्या शिकवायची गरज पालकांना कधीही वाटली नसेल. हा वारसा पुढे चालवला जाऊ शकतो असे किती पालकांना वाटते? मुलांना घरगुती कामे शिकवू शकतात. त्यातून श्रमसंस्कार घडेल. कामाचे मोल समजले. कोणतेही काम कमी अथवा छोटे नसते हे कळेल. सुट्टीत थोड्या मोठ्या मुलांना बँकेचे व्यवहार समजावले जाऊ शकतील. बँकेतील ग्राहकांच्या रांगेत उभे राहणे संयम शिकवते. आत्ता लगेच हवे या भावनेला आवर कसा घालायचा हे मुलांना कदाचित त्यातुन कळेल. कोणत्याही कलेचा स्पर्श मुलांचे जगणे समृद्ध करतो. गाणे ऐकायचे कसे, वाद्य वाजवायला शिकण्यासाठी रियाज कसा नियमित लागतो, नाटकामुळे संवादाची फेक कशी करायची, अशी अनेक कौशल्य मुले शिकतील. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही असा सुविचार मुले शाळेत शिकतात त्याचा व्यापक अर्थ हाच असावा का? अशा अनेक गोष्टी मुलांना शिकवण्यासाठी सुट्टीसारखी दुसरी संधी पालकांना कदाचित मिळणार नाही. पालकांनी अभ्यासाचा अती बाऊ करू नये असेच मोहन आगाशे यांना सुचवायचे असावे. पालक ते लक्षात घेतील आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देतील अशी अपेक्षा करावी का?