अलका दराडे
घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…
बाळाच्या गोड आगमनाने घरातील आई आजी होते नि तिला आता स्वर्ग दोन बोटे उरतो. हा बहुमान बाळ तिला देते. बाळाच्या तब्येतीसाठी तर ती कंबरच कसते. घरातील बाळांतिणीसाठी मेथी नि डिंकाचे लाडू मेहनतीने अगदी मन लावून करते. आजी मोठ्या कौतुकाने बाळाला तेल मालीश करून आपल्या पायांवर त्याला अंघोळ घालते. त्याला व्यवस्थित कपडे घालून ती गाणेही म्हणू लागते.
अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं
रूप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीट लावा
असे गोड गाणे म्हणत ती बाळाला कोणाची दृष्ट होऊ नये म्हणून हळूच काजळाच्या बोटाने तीटही लावते. बाळाची आई नोकरीनिमित्त बाहेर पडते नि सासूमध्येच आईला पाहणार्या सुनेची बाळाविषयी काळजी लागत नाही. खरे तर सासू सुनेचे नाते अगदी मधातील गोडव्याप्रमाणे असते, पण हे नाते उगाचच बदनाम झाले आहे. मलाही दोन सुना आहेत. नाशिकला आल्या की माहेरी आलेल्या मुलीसारख्या मोकळ्या मनाने राहतात. सासूच्या मायेची महती सुनेलाही असते म्हणून तर ती नोकरी करू शकते.
आजी या बाळांना एक घास चिऊचा, एक घास.. असे गाणे म्हणत कौतुकाने घास भरवते नि दुडू दुडू पळू लागत मुले मोठी होऊ लागतात. त्यांच्या खाण्याच्या वेळा, खेळण्याच्या वेळा याकडे आजीचे कटाक्षाने लक्ष असते. त्यांची प्रत्येक गोष्ट वेळेवर व शिस्तीतच झाली पाहिजे याकडे आजीचे बारकाईने लक्ष असते कारण तिला वाटते जशी आपली मुले सुसंस्कृत झाली तशी ही पण मोठी झाली पाहिजे. आम्हाला शाळेत असताना कवी प्रल्हाद केशव अत्रे यांची एक कविता होती. त्या वेळी सर्व कविता धडाधड तोंडपाठ असत आमच्या. कवितेचे नाव होते ‘आजीचे घड्याळ’ आजी प्रत्येक काम अगदी वेळेवर करते पण तिच्याकडे तर घड्याळच नाही मग तिला कसे जमते बरे? हा मोठा प्रश्न मुलांना पडे. पण आजीचे धड्याळ साक्षात निसर्गाचे होते. पहाटे साडेपाचला कोंबडा आरवला की ती मुलांना अभ्यासाला उठवे, ओट्यावर ऊन आले की तिला कळे दहा वाजले नि मुलांना ती शाळेत पाठवी नि घंटानादही ऐकू येई. मुले संध्याकाळी खेळताना ती गाई परतण्याचा घंटाध्वनी ऐके व मुलांना दिवेलागण झाली, चला परवचा म्हणा असे म्हणत घरात बोलवी. ती मुलांना गोष्टी सांगताना तिला पर्वतावरील चौघडा ऐकू येई व ती सहजपणे मुलांना म्हणे, गोष्ट पुरे, जा पडा.
मुलांना मोठे कौतुक वाटे आजीच्या घड्याळाचे. पण ते घड्याळ त्यांना घरात कुठेच सापडत नाही, अगदी आजीच्या कपाटात पण मिळत नाही.