मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जवळपास ११ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे (संक्षिप्त)
१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार. व्यवसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करुन देणार.
२) राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार/आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार. राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाजनिर्मिती, अनिष्ठ रुढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास. हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणार्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार. हे अभियान राबविण्यासाठी १०.५० कोटी रुपये खर्च करणार.
३) धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्यात येणार. ‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविली जाणार. दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण दिलं जाणार. आतापर्यंत यासाठी 288.92 कोटी रुपये वितरित करण्यात आला आहे. राजे यशवंतराव होळकर यांनी 1797 ते 1811 या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे ही योजना असेल.
४) धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव देण्यात येईल. राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वसतीगृह असतील. प्रत्येकी 200 क्षमतेची ही वसतीगृह असणार आहेत. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर, मुलींसाठी 100 क्षमतेचे वसतीगृह असेल. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह असतील. नाशिक येथे काम सुरु, पुणे, नागपूर येथे लवकरच सुरु होणार आहे. या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव असेल.
५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविली जामार आहे. राज्यात असे 3 ऐतिहासिक तलाव चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी इथे आहेत. 19 विहिरी,6 घाट, 6 कुंड अशा एकूण 34 जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभिकरण इत्यादी कामे केली जातील. यासाठी 75 कोटी रुपये खर्च केला जाईल.
६) अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यात येईल. या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल. यासाठी 485.08 कोटी खर्च करणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा, मनुष्यबळासह यासाठी देणार असल्याचा निर्णय ही घेण्यात आला.
७) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून 5503.69 कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन केली जाईल. त्यासाठी 681.32 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. शिवाय अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार147.81 कोटी, श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा 1865 कोटी, श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा 259.59 कोटी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा 275 कोटी, श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा 1445.97 कोटी, श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा 829 कोटी देण्यात येणार आहेत.
८) अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरु करणार
९) राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय
१०) ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी 2022-25 ऐवजी 2028 पर्यंत वाढविण्याचा निर्णय
११) नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-2025 जारी करण्याचा निर्णय