Wednesday, May 20, 2026
Homeनगरमंदिरात आधी देवाला घातलं साकडं, मग चोरलं सोन्याचं मंगळसूत्र; पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या...

मंदिरात आधी देवाला घातलं साकडं, मग चोरलं सोन्याचं मंगळसूत्र; पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

घारगाव । प्रतिनिधी

लग्नाकार्यात लागणाऱ्या महागड्या डीजे सिस्टीमचे ॲम्प्लीफायर, मिक्सर आणि मंदिरांमधील मौल्यवान दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना मोठे यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बेल्हे येथील मुक्ताई मंदिरात चोरी करण्यापूर्वी मुख्य चोरट्याने आधी देवाच्या पाया पडून दर्शन घेतले आणि नंतर देवीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले होते.

- Advertisement -

मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्याच्या ‘लाल रंगाच्या शूज’चा सुगावा आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून आळेफाटा, ओतूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्यमाल जप्त करण्यात आला आहे.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुकाराम पोपट कातोरे (वय २४ वर्षे), निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ (वय २० वर्षे, अजय किसन मेंगाळ (वय २६ वर्षे) सर्व राहणार (जांभुत बुद्रुक ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी मिक्सर, डीजे मशीन आणि मंदिरात चोऱ्या झाल्याच्या तक्रारी दाखल होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवली. तपास करत असताना बेल्हे गावातील प्रसिद्ध मुक्ताई मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यामध्ये मुख्य चोरटा मंदिरात प्रवेश केल्यानंतर आधी देवाच्या पाया पडताना दिसला, त्यानंतर त्याने देवीच्या अंगावरील सोन्याचे बेन्टेक्स मंगळसूत्र चोरले. या कृत्य दरम्यान चोरट्याने घातलेले ‘लाल रंगाचे शूज’ सीसीटीव्हीमध्ये ठळकपणे दिसून आले.

गुन्हेगारी जगतात विशिष्ट गुन्हेगार अशा पद्धतीचे शूज वापरतात, हा धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्र फिरवले. पोलिसांनी मुख्य आरोपी तुकाराम कातोरे याला निष्पन्न करून त्याच्या मेव्हण्यांसह तिघांना बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईमुळे आळेफाटा पोलीस ठाण्यातील ३, ओतूर पोलीस ठाण्यातील १ आणि अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश ठावरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र हिले, पोलीस हवालदार भीमा लोंडे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर आणि सखाराम झुंबडे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुख्य आरोपी तुकाराम कातोरे हा रा. कळंब (ता. आंबेगाव) भागात भाड्याने शेती करतो. तर त्याचे दोन मेव्हणे निवृत्ती मेंगाळ आणि अजय मेंगाळ हे डीजे ऑपरेटर आहेत. तुकाराम हा वेगवेगळ्या भागातून महागड्या डीजे सिस्टीमचे ॲम्प्लीफायर आणि मिक्सर चोरायचा आणि ते आपल्या मेव्हण्यांना आणून द्यायचा. हे दोघे मेव्हणे या चोरलेल्या साहित्याचा वापर लग्नकार्यात आणि इतर कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्याच्या सुपाऱ्या घेण्यासाठी करत असत. याशिवाय घारगाव हद्दीतील एका प्राथमिक शाळेतून त्यांनी लहान मुलांना दाखवण्यासाठी असलेला एलईडी डिस्प्ले (टीव्ही) देखील चोरला होता.

आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ महागडे ॲम्प्लीफायर मशीन, दोन ऑडिओ मिक्सर, एक एलईडी टीव्ही, देवीचे बेन्टेक्स मंगळसूत मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री

Devendra Fadnavis: पुढल्या २० वर्षांचे आपले…; शरद पवारांकडून मोदींच्या कौतुकावर मुख्यमंत्री...

0
मुंबई | Mumbai"राजकीय विचारसरणी आणि भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी देशहिताच्या मुद्द्यावर कधीही राजकारण आणता कामा नये," अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...