नाशिक। प्रतिनिधी Nashik
एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही कॅमेरे जाळून चाेरट्यांनी एटीएम मशिन चाेरुन नेले आहे. ही घटना मुंबई नाका पाेलिसांच्या हद्दीतील विनयनगर परिसरात घडली असून मशिनमध्ये २६ ते २७ हजार रुपयांची राेख रक्कम हाेती, असे पाेलिसांनी सांगितले आहे.
मुंबईनाका पाेलिसांनी तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरु केला आहे. एटीएममधून पैसे पळविण्याच्या घटना ताज्या असताना आता थेट एटीएमच पळवून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
विनयनगर पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या एटीएमसमोर अनेक दुकानेही आहेत. नव्यानेच लावण्यात आलेल्या या एटीएमबाबत अद्याप नागरिकांनाही माहिती नव्हती. तरीही चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न न करता थेट मशीनच काढून नेल्याने चर्चेचा विषय ठरताे आहे.
मुंबई नाका पोलिसांनी भेट देत माहिती घेतली असून सीसीटीव्हीची तपासणी सुरु आहे.