Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगविचार तर आजोबांना

विचार तर आजोबांना

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

आपल्या खेळाच्या मध्यंतरानंतर पुन्हा खेळायला तुम्ही उत्सुक झाला असणार! खेळाच्या पाचवा टप्पा आता आपण आपल्या आजोबांबरोबर खेळायचा आहे. ते नसतील तर तुमच्या शेजारी, तुमच्या ओळखीतले जे कोणी आजोबा असतील त्यांना तुम्ही विचारायचे आहे, आजोबा, माझ्यातले कोणते गुण तुम्हाला अधिक आवडतात?

- Advertisement -

तुमचा प्रश्न ऐकून आजोबा नक्कीच विचारात पडतील. तसेच तुम्ही त्यांचे मत विचारात घेत आहात म्हणून त्यांना आनंद वाटेल आणि खुशीने ते तुमच्यातले चांगले गुण सांगतील. आजोबांकडे एका कोर्‍या कागदावर पाच सें.मी. बाजू असलेला समभूज त्रिकोण काढून कमीत कमी तीन किंवा जास्तीत जास्त सहा चांगले गुण लिहिण्यास सांगायचे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मी समभूज त्रिकोणच का काढायला सांगितले? कारण मुलांनो, आपण हसत खेळत भूमिती या विषयाचा अभ्यास कसा करायचा तेही लक्षात घेऊया.

त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते म्हणजेच समभूज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात. याचाच अर्थ समभूज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. त्रिकोणाच्या बाजूंची लांबी बदलली तरीदेखील समभूज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंशाचाच असतो. हे लक्षातच ठेवायचे असते. मग इतर उदाहरणे सोडवणे सोपे जाते.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

आजोबांकडून तुमच्यातले चांगले गुण लिहून घ्यायचे. पण खरे नेहमीच आणि नियमितपणे आजोबांची छोटी-मोठी कामेपण करायची बरं का! आजोबांना चष्मा आणून देणे, पिण्यासाठी पाणी आणून देणे, आजोबा बाहेर जातात तेव्हा त्यांचा मोबाईल आठवणीने घेऊन जाण्यास सांगणे, काठी लागत असल्यास हातात काठी देणे अशी कामे दररोज करायची बरं का! आजोबा खूश आणि घरही खूश. चला तर मग आता तुमच्या सारख्याच एका विद्यार्थिनीशी पत्रातून केलेल्या गप्पा वाचूया आणि एका नवीन करिअरची ओळखही करून घेऊया.

चि. सानिकास,

शुभाशीर्वाद.

सानिका, तुला कॉमर्स फॅकल्टीत प्रवेश घेऊन गणित विषयात करिअर करायचे आहे. ही निश्चितच चांगली बाब आहे. मातृभाषेवर प्रभुत्व मिळवतानाच इंग्रजी व गणित या विषयांचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. उन्हाळ्याच्या सुट्टीत गणित, इंग्रजी या विषयांचा सराव चालू ठेवावा. परीक्षा झाली म्हणजे मागील इयत्तांचा अभ्यास विसरायचा नसतो, तर सुट्टीत पुन्हा अभ्यास चालू ठेवावा. म्हणजे अकरावी, बारावीचा अभ्यास करणे सुलभ होईल. एम. कॉम., सी.ए., आय.सी.डब्ल्यू.ए. व बँकेच्या स्पर्धा परीक्षा देऊन बँकिंग क्षेत्रात करिअर करता येते. कॉमर्स फॅकल्टीत प्राध्यापक म्हणून अध्यापन करणे, मोठमोठ्या कंपनीत अकाऊंटंटची गरज असते. तसेच कंपनी सेक्रेटरी म्हणूनही करिअर करू शकतेस. अर्थतज्ज्ञ बनणे. बी.कॉम. एल.एल.बी. करून वकिलीच्या क्षेत्रातही उल्लेखनीय करिअर करता येते. अजूनही बर्‍याच क्षेत्रात तुला करिअर करता येईल. तूर्तास एवढेच.

तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

तुझी,

ताई.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या