अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या जिल्ह्यातील 138 तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये,असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. जिल्हा पोलिसांनी 41 ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत एकूण 138 जण सापडले. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील हॉटेल, बार आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत 31 डिसेंबरच्या रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रभारी अधिकार्यांना दिले होते. प्रभारी अधिकार्यांनी आपआपल्या हद्दीत रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत नाकाबंदी केली होती. नाकाबंदी दरम्यान संशयित एक हजार 622 वाहन चालकांची पोलिसांनी ब्रेथ नालायझर तपासणी केली असून त्यात मद्यपान करून वाहन चालवणार्या 138 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
नाकाबंदीला साडेतीनशे पोलिसांची फौज
थर्टी फर्स्टच्या रात्री आठ ते दुसर्या दिवशी पहाटे चार पर्यंत जिल्ह्यातील 32 पोलीस ठाणे हद्दीत 41 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यासाठी 38 अधिकारी आणि 309 पोलीस अंमलदार नियुक्त केले होते. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील प्रमुख चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. या दरम्यान पोलिसांनी एक हजार 622 संशयित वाहनांची तपासणी केली. त्यात 138 वाहन चालक मद्य प्राशान करून वाहन चालविताना मिळून आले.
दोन लाखांचा दंड वसूल
हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न लावणे आदी वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहन चालकांवर देखील पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील 250 वाहन चालकांवर कारवाई करून एकूण दोन लाख 8 हजार 550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.