मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (State Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत ई-बाईक टॅक्सीला (E-bike taxis) परवानगी देण्याच्या निर्णयासह टोलबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे. बाईक टॅक्सीला परवानगी देत असताना या बाईक टॅक्सीला नियमांच्या आधीन राहून काम करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासोबतच पुणे-शिरूर-अहिल्यानगरमार्गे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) टोलवसुली केली जाणार असून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व वाहनांना टोल द्यावा लागणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय खालीलप्रमाणे
नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेने निष्कासित केलेल्या वाहनांच्या अनुषंगाने सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णय. (गृह विभाग-परिवहन)
बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण : ०१ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात. रमानाथ झा समिती शिफारशी सुधारणेसह लागू करणार. (गृह विभाग-परिवहन)
नागन मध्यम प्रकल्प, जिल्हा नंदूरबार प्रकल्पासाठी १६१.१२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
सिंदफणा नदीवरील निमगाव ता. शिरूर जिल्हा बीड कोल्हापूरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी २२.०८ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब ता. शिरूर जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी १७.३० कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
सिंदफणा नदीवरील टाकळगाव (हिंगणी) ता. गेवराई जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी १९.६६ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी ०१ हजार ८८६ कोटी ५ लाख कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता, यातील ९४३.०२५ कोटी इतकी ५० टक्के रक्कम राज्य सरकार देणार. (गृह विभाग/परिवहन)
पुणे-शिरूर-अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा आणि काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या २००८ पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
अजनी, नागपूर येथील देवनगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी च्या जागेवरील क्रीडांगणांचे आरक्षण रहिवासी करण्याचा निर्णय. (नगरविकास विभाग)
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना धानासाठी पणन हंगाम २०२०-२१ करिता प्रोत्साहनपर ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचे अनुदान मंजूर. (अन्न व नागरी पुरवठा)