Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधव्टिटर विरूध्द थ्रेड्‌स

व्टिटर विरूध्द थ्रेड्‌स

महेश कोळी, संगणक अभियंता

थ्रेडस्… आपले विचार जगासोबत शेअर करण्यासाठी उपलब्ध झालेल्या नव्या व्यासपीठाचे हे नाव. हे नवीन अ‍ॅप स्टायलिश आणि इतरांपेक्षा वेगळे आहे. मार्क झुकरबर्ग यांनी ते जगभरातील 100 देशांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. ‘थे्रडस् ट्विटरला टक्कर देणारे माध्यम म्हणून आणण्यात आले आहे. फेसबुकचा उदय झाल्यानंतर जवळपास 15 वर्षांनंतर 5 जुलै 2023 मध्ये मेटा कंपनीने थ्रेडस् अ‍ॅप लाँच केले.

- Advertisement -

एखादे अ‍ॅप लाँच झाल्याच्या पाच दिवसांत 10 कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्विटर ही कंपनी एलॉन मस्कने ताब्यात घेतल्यानंतर त्यात करण्यात आलेल्या बदलांवरून तसेच या कंपनीतील कर्मचारी कपातीवरून जगभरातून मस्कवर टीका होत होती. ब्ल्यू टीकसाठी शुल्क आकारणीचा निर्णय असेल किंवा अन्य काही निर्णयांमधून मस्कच्या अधिपत्याखालील ट्विटरचे भवितव्य कसे असेल याबाबत सर्वदूर चिंता व्यक्त होती. एलॉन मस्कने अलीकडेच याबाबत एक मोठी चूक केली. ‘ट्विटर’ने चालू महिन्याच्या प्रारंभीच ट्विटर पोस्ट वाचण्यावर मर्यादा आणली. यानुसार व्हेरिफाईड युजर दिवसभरात केवळ दहा हजार पोस्टच वाचू शकतील. तसेच अनव्हेरिफाईड युजरसाठी ही संख्या एक हजार करण्यात आली. कालांतराने अनव्हेरिफाईड नव्या युजरसाठी ही मर्यादा आणखी कमी करून 500 वर आणली. मर्यादा लागू करणे हा एकप्रकारे ‘ट्विटर’चा सेल्फ गोल ठरला. ब्लू टिक सब्सक्रिप्शन लागू केल्याने युजरनी अन्य पर्यायांचा शोध सुरू केला. त्यावेळी ट्विटर सोडणार्‍यांना ‘मस्टोडॉन’देखील पर्याय दिसत होता. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सीने ‘ब्लू स्काय’ नावाचा पर्यायही सादर केला होता. पण यापैकी कोणतेच अ‍ॅप संपूर्णपणे पर्याय म्हणून नावारूपास येऊ शकले नाही. हे काम झुकेरबर्गने थ्रेडस्च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, इंस्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनी या सोशल वॉरबाबत मत मांडताना ट्विटरला रिप्लेस करण्यासाठी थ्रेडस् आणण्यात आले नसल्याचा दावा केला आहे. ज्यांनी आयुष्यात कधीही ट्विटरचा कधीच वापर केला नाही अशा युजर्सना एक सार्वजनिक मंच उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे, असे मोसेरी यांनी म्हटले आहे. सोशल नेटवर्किंग तयार करणे आणि त्याची परिणामकता वाढवणे याचा चांगला अनुभव झुकेरबर्ग कंपनीकडे आहे. त्यामुळे थ्रेडस्कडून जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. थ्रेडस् युजर्स जास्तीत जास्त 500 कॅरेक्टरसह पोस्ट करण्यास सक्षम असतील.

ट्विटरवर ही मर्यादा 280 शब्द इतकी आहे. यासोबतच युजरला फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. सध्या पाच मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करता येताहेत. भविष्यात ही मर्यादा वाढू शकते. इन्स्टाग्राम युजर्सना थ्रेडस्साठी वेगळे खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. थ्रेडस् अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर अ‍ॅप आपोआप लॉगिन होते. लॉग इन केल्यानंतर थ्रेडस्वरील कॉन्टॅक्टची संपूर्ण यादी दिसेल आणि त्यापैकी कोणाला फॉलो करायचे आहे युजर्सना ठरवता येते. वापरकर्त्याला थ्रेडस् अ‍ॅपचे प्रोफाईल सार्वजनिक आणि खासगी ठेवण्याचे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. सध्यातरी हे जाहिरातमुक्त अ‍ॅप आहे. पण भविष्यात या अ‍ॅपवरही जाहिराती दिसू लागतील, यात शंका नाही. थ्रेडस्चा लूक आणि फिल हुबेहूब इन्स्टाग्रामप्रमाणे आहे. पण फिचर्स ट्विटरसारखे आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमधील या स्पर्धात्मकतेचा आपल्याला काय उपयोग होईल असा विचार करत असाल तर ते वेडगळपणाचे ठरेल. कारण या आभासी जगात आपण नदीच्या पाण्यातून वाहत जाणार्‍या पानांसारखे असतो. या प्रवाहात युजर्स हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ग्राहक असतात. त्यांना सतत काहीतरी नवे हवे असते. ते उपलब्ध झाले की ग्राहकपणाचा विसर पडतो. याचाच थ्रेडस् किंवा भविष्यात येणार्‍या नव्या व्यासपीठांना-उत्पादनांना फायदा होत राहणार आहे. यादरम्यान प्रश्न आहे तो ट्विटरचा. या माध्यमाची घसरलेली लोकप्रियता उत्तरोत्तर अशीच घसरत जाईल की ‘टेस्ला’कार मस्क आपल्या स्वभावानुसार अनपेक्षित धक्कातंत्राचा वापर करून या स्पर्धेला नवे वळण देतात हे पाहावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या