Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखहा अभ्यास कर्करुग्णांना दिलासा देणारा ठरावा!

हा अभ्यास कर्करुग्णांना दिलासा देणारा ठरावा!

नुकताच जागतिक कर्करोग दिवस साजरा झाला. अनेक प्रकारचे कर्करोग आणि त्यांची वेगवेगळी लक्षणे आढळतात. भारतातातही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण एकूण रुग्णांच्या जवळपास 90 टक्के आहे.

25 टक्क्यांपेक्षा जास्त पुरुषांचा तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे तर, 25 टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रियांचा तोंड आणि स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू होतो असे सांगितले जाते. भारतात आढळणार्‍या सर्व प्रकारच्या कर्करोगांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी ‘इंडियन कॅन्सर जीनोम ऍटलास’ हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात कर्करोग रुग्णांच्या नमुन्यांचा जनुकीय अभ्यास केला जाईल.

- Advertisement -

कर्करोगाच्या विषाणूतील बदल, परदेशातील आणि भारतातील कर्करोगातील फरक, कर्करोगाचे लवकर निदान कसे होईल असे अनेक मुद्दे अभ्यास करताना विचारात घेतले जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत स्तनाच्या कॅन्सरचा अभ्यास सुरु झाला आहे. भारतात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारतातील कर्करोगाचा वेगळा अभ्यास व्हायला हवा असे तज्ज्ञांनी मांडले होते. तसे प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर सुरु झाले आहेत.

समाज आणि विशेषतः कर्करोग रुग्णांसाठी ही बातमी दिलासादायक ठरेल. अनेकदा भारताबाहेरचे रोग जसेच्या तसे भारतात येतात असे गृहीत धरले जाते. भारताच्या तुलनेत पाश्चात्य देशांमध्ये संधोधन पद्धती अधिक विकसित आहे. त्याला आरोग्य क्षेत्रही अपवाद नाही. साहजिकच विविध रोगांवरील लसी आणि उपाययोजना यात पाशात्य देश आघाडीवर असतात. त्यामुळेच आपल्याकडच्या अनेकांना परदेशात उपचारासाठी जावेसे वाटते. परदेशात उपचार घेतल्यामुळे जीव वाचला अशी बढाईही अनेक जण मारतांना आढळतात आणि अनेक मोठमोठे लोक तिथूनच परलोकाकडे प्रयाण करतात.

पाश्च्यात्य देशातून येणारे रोग आणि त्यावरच्या उपाययोजना आहे तशाच स्वीकारल्या जातात. मोठमोठी रुग्णालये पाश्चात्य उपचारपद्धतींची जाहिरातही करतांना आढळतात. पाश्च्यात्य देशांमधील आणि भारतातील हवामान, जीवनशैली, सामाजिक परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तोच फरक रोग आणि त्यावरचे उपचार यातही असण्याची शक्यता नाकारणे योग्य ठरेल का? विशेषतः कर्करोगासारख्या व्याधीवर भारतात पाश्चात्य देशांच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे उपचार केले जातात. काहींना ते उपचार लागू पडतात तर काहींना लागू पडत नाहीत. याची नेमकी कारणे काय असावीत याचाही शोध या अभ्यासादरम्यान लागू शकेल. जगात आणि भारतात अनेक प्रकारच्या उपचारपद्धती आहेत.

भारताला आयर्वेदाची प्राचीन परंपरा आहे. कॅन्सरसारखे आजार आणि त्यावरचे उपाय याचा उल्लेख भारतामध्ये आयुर्वेद आणि सिद्ध कालीन पांडुलिपीत आढळतो असेही मानणारे कमी नाहीत. तथापि भारतात सध्या आयुर्वेद आणि ऍलोपॅथी यात वादंग सुरु आहे. कर्करोगाचा समूळ अभ्यास करतांना आयुर्वेद आणि ऍलोपॅथी उपचारपद्धती परस्पर विरोधी नाहीत. किंबहुना त्या एकमेकांना पूरक ठरू शकतात. हेही समाजासमोर आणणे असाही एक हेतू या अभ्यासामागे असावा का? तसे असेल तर आयुर्वेदाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा उद्देश योग्य म्हणावा लागेल. अनेक विकारांवर आयुर्वेदाची साधी साधी औषधे उत्तम प्रकारे परिणामकारक ठरतात.

घरोघरी आढळणारा ‘आजीबाईचा बटवा’ तरी दुसरे काय आहे? आजीबाईच्या बटव्यातील छोटेछोटे कानमंत्र आजही तितकेच उपयोगी आणि ‘उपचारांपेक्षा काळजी घेतलेली बरी’ यात मोडणारे आहेत. तथापि सगळ्याच गोष्टींमध्ये ‘त्वरित’ (इन्स्टंट) दृष्टिकोन वाढला आहे. आयुर्वेदिक औषधांमुळे रुग्णांना हळूहळू आराम पडतो. त्यामुळे ताबडतोबीच्या या घाईला मर्यादा कशी घालता येईल यावरही तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे. तसे झाले तर विविध व्याधींवर इतर कोणत्याही उपचारपद्धतींपेक्षा आयुर्वेदात अधिक परिणामकारक औषधांचा शोध लागणे शक्य आहे. अनेकार्थांनी या अभ्यासातून चांगले निष्कर्ष हाती लागण्यास वाव आहे असे गृहीत धरणे सुद्धा योग्य नव्हे.

- Advertisment -

ताज्या बातम्या