Monday, March 31, 2025
Homeनगरयंदा भरपूर पाऊस, अन्नधान्यही मुबलक

यंदा भरपूर पाऊस, अन्नधान्यही मुबलक

चांदेकसारे बाल भैरवनाथांचा आणि वैजापूरच्या स्मशानातील गुढीचा कौल

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकले जाईल तसेच चालू वर्षात अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, असा कौल दिला. बाल भैरवनाथ आणि दिलेला कौल तंतोतंत खरा ठरत आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामस्थ व पुरोहित यांच्या उपस्थितीत पर्जन्यमान नक्षत्र तपासणीचा कार्यक्रम केला जातो. एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित व ग्रामस्थ यांच्या मदतीने अठरा नक्षत्र रुपी गाडग्याच्या आकाराचे खड्डे घेतले जातेात या एकसारख्या खड्ड्यामध्ये वडाची पानं ठेऊन या पानांमध्ये सप्तधान्य व पाणी साठविले जाते.

- Advertisement -

रात्रभर ही नक्षत्र रुपी खड्डे झाकून ठेवली जातात. दुसर्‍या दिवशी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर चालू वर्षात पर्जन्यमान कसे होईल हे सांगण्यात येते. नक्षत्र रुपी खड्ड्यामध्ये वडाच्या पानांमध्ये जर जास्त पाणी शिल्लक राहिले तर त्या नक्षत्रात चांगला पाऊस, ज्या नक्षत्ररुपी खड्ड्यात मध्यम पाणी शिल्लक राहील त्या नक्षत्रात मध्यम पाऊस तर ज्या नक्षत्र रुपी खड्ड्यात पाणीच शिल्लक राहणार नाही ते नक्षत्र कोरडे जाणार असल्याचे होईक सांगितले जाते. जयद्रथ होन व त्यांच्या सहकार्‍यांनी शनिवारी रात्री या खड्ड्यांची पूर्वतयारी करून ठेवली होती.

पुरोहित उमेश जोशी गुरु यांच्या हस्ते नक्षत्र रुपी खड्ड्यांची पूजा झाल्यानंतर 18 नक्षत्रा मधील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. पर्जन्यमान वर्तवल्यानंतर चालू वर्ष कसे जाणार असल्याचे पंचांग वाचन करून सांगितले. यावेळी यात्रेचे नियोजन करण्यात आले. तेलवण शनिवार 5 एप्रिल रोजी पडणार आहे. रविवारी रामनवमीपासून पाच दिवसाचे उपवास सुरू राहणार आहे. बाल भैरवनाथ व जोगेश्वरीचा रथ उत्सव 10 एप्रिल रोजी असणार आहे. जत्रा व कुस्त्यांचा हगामा 11 एप्रिल रोजी होईल. हनुमान जयंती 12 एप्रिलला असून भैरवनाथ यात्रा उत्सव जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. बाल भैरवनाथ यात्रा उत्सव व दर्शनाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भैरवनाथ ट्रस्ट चांदेकसारे, यात्रा उत्सव कमिटी व चांदेकसारे ग्रामस्थांनी केले आहे.

वैजापूरच्या स्मशानातील गुढीचा कौल

वैजापूर | Vaijapur

यावर्षी पर्जन्यमान चांगले राहणार असून पीक पाणी ही उत्तम राहणार आहे, परिटाच्या घरी पाऊस आहे तर बाजारात तेजी-मंदीही सम-समान राहणार आहे. देशातील नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहील तसेच धन-धान्यही चांगले राहील असे भाकीत वैजापूर येथील स्मशान भूमीत उभारलेल्या गुढीतून काल रविवार पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्मशान भूमीत उभारलेल्या गुढीतून महंत गुरू सुभाष हतवळणे यांनी शहरातील नागरिकांच्या निदर्शनाला आणून दिले आहे. मागच्या दोन वर्षे खंडित झालेली स्मशानात भूमीत गुढी उभारून मराठी नववर्ष दिनी भाकीत विशद करण्याची ही परंपरा शालिवाहन काळापासून चालत आलेली आहे.
साळुंके पाटील परिवाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या एक दिवस अगोदर येथील स्मशान भूमीत हा सण साजरा केला जातो. वैजापूरच्या गुढीला विशेष महत्व आहे. या गुढी वरून येणार्‍या वर्षातील पीक पाणी, बाजारातील तेजी-मंदी, धन-धान्य स्थिती, देशातील नागरीकांचे आरोग्य या बाबतचे आराखडे या गुढीच्या माध्यमातून बांधले जातात.

गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्याच्या दिवशी स्मशान भूमीत ज्या ठिकाणी पार्थिवावर अंतिम संस्कार केलेले असतात ती जागा स्वच्छ केली जाते,त्यावर पाणी शिंपडले जाते.त्या जागेवर मडके ठेऊन, श्रीफळ आदी गुढीचे प्रतीक म्हणून ठेवले जाते,त्याच्या दक्षिण बाजूस बारा मराठी महिन्याचे बारा खड्डे ,तसेच पूर्व,पश्चिम,उत्तर दक्षिण,तसेच राजभग प्रजाभाग असे एकूण 18खड्डे केले जातात,या प्रत्येकात 21व21 ज्वारीचे दाणे टाकून त्यावर रुई ची पाने ठेवली जातात.यावर्षी साळुंके परिवारातील दीपक सोपानराव साळुंके याच्या द्वारे पूजा करण्यात आली.पाडव्याच्या दिनी म्हणजे या वर्षी रविवार(ता,30)रोजी भल्या पहाटे गुढीला पंचधान्य नैवैद्य दाखविण्यात आला व कावळा नैवैद्याला स्पर्श करण्याची वाट पाहण्यात आली,यावर्षी कावळा आलाच नाही,म्हणून सव्वा सात वाजता प्रत्येक खड्यावर ठेवलेले रुईचे पान काढून खड्यातील दाणी मोजण्यात आली. ज्या खड्यात दाणे कमी त्या महिन्यात मंदी असा तर्क काढला जातो,व ज्या महिन्याच्या खड्यात दाणे वाढले त्या महिन्यात तेजी असे आराखडे बांधल्या जातात.

या वर्षी श्रावण महिन्यातिल खड्ड्यात कमी दाणे दिसून आले त्या मुळे या महिन्यात मंदी असेल असा तर्क काढण्यात आला.इतर खड्यात एक-किंवा दोन दाणे कमी-जास्त आढळून आले ,त्यामुळे इतर महिन्यात फार कमी प्रमाणात तेजी-मंदी असेल असे तर्क लावण्यात आले.हे तर्क व भाकीत ऐकण्यासाठी पाटील गल्लीतील मारोती मंदिरात शहर व परिसरतील

नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रसंगी मानकरी दीपक सोपानराव साळुंके यांच्या व्यतिरिक्त मधुकर साळुंके,शिवाजी साळुंके,अरविंद साळुंके,सामाजिक कार्यकर्ते व या प्रक्रियेची माहिती नव्या पिढीला विशद करणारे जेष्ठ नागरिक ठा,धोंडीरामसिंग राजपूत, तसेच रामकृष्ण पुतळे, सजनराव गायकवाड,शंकरराव साळुंके, निखाडे पाटील,रामनाथ गावडे,संदीप व अरुण साळुंके,भगवान साळुंके,गंगाधर साळुंके, भाऊसाहेब साळुंके, राजेंद्र साळुंके, यांच्या सह असंख्य नागरिक उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : महिलेवर कोठला परिसरात टोळक्याचा हल्ला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील कोठला, घासगल्ली येथे राहणार्‍या एका महिलेला मारहाण केल्याची घटना शनिवारी (29 मार्च) सायंकाळी घडली. गौसीया शेरू शेख (वय 24) असे मारहाण...