अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यासह राज्याची लक्ष लागलेल्या संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखाना आणि आणि प्रवरेच्या डॉ. विखे पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर या प्रारूप यादीवर हरकती आक्षेप पूर्ण होऊन 21 मार्चला या दोन साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यामुळे या दोनही साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आजपासून निवडणूक पूर्व तयारी सुरू होणार आहे. तसेच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक रणधुमाळी पेटणार आहे.
दरम्यान, संगमनेर आणि डॉ. विखे पाटील साखर काराखान्याच्या निवडणुकीमुळे संगमनेर आणि राहाता तालुक्यातील सहकाराचे राजकारण पुन्हा तापणार आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर संगमनेर तालुक्यातील सहकाराची प्रमुख संस्था असणार्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 6 मार्चपर्यंत या यादीवर हरकत अथवा आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर 17 मार्च रोजी दाखल हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर 21 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या कालावधीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरानगरच्या डॉ. विखे पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आजच प्रारूप यादी प्रसिध्द होणार असून थोरात कारखान्याप्रमाणे या ठिकाणी देखील मतदारयादी कार्यक्रम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक साखर नगर संतोष बिडवई यांनी दिली.
विखेचे 11 हजार, थोरातांचे 19 हजार सभासद
निवडणुका होणार्या संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखान्याचे 19 हजार शेतकरी सभासद असून त्यांची नावे आजच्या प्रारूप यादीत प्रसिध्द होणार आहेत. तर प्रवरानगरच्या डॉ. विखे पाटील साखर कारखान्यांत 11 हजार शेतकरी सभासद असून त्यांची नावे आजच्या प्रारूप यादीत प्रसिध्द होणार आहे. यापूर्वी सहकार निवडणूक प्रधिकरण यांच्याकडे संस्था मतदारसंघातून विखे पाटील कारखान्यांचे 45 तर थोरात काराखान्यांचे 71 सभासदांची नावे आलेली आहेत.
पुढील आठवड्यात डॉ.तनपुरेंची प्रारूप यादी
पुढील आठवड्यात राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखाना निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक झालेली नाही. यामुळे यंदा होणारी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे जिल्ह्यातील संगमनेर, डॉ. विखे पाटील आणि डॉ. तनपुरे साखर कारखान्यांची निवडणूक एकाच कालावधीत होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष रागून राहणार आहे.