संगमनेर (प्रतिनिधी)- विखे यांना पक्ष बदलण्यासाठी सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे. त्यांच्या वक्तव्याला मीच काय कोणीही महत्व देत नाही, अशी टिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. साडेचार वर्षे काँग्रेसने विरोधीपक्ष नेत्याची संधी दिलेली असताना त्यांनी केलेले पक्षविरोधी काम राज्याने पाहिले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ना.बाळासाहेब थोरात दोन वर्षापूर्वी भाजपा प्रवेशाच्या विचारात होते, असा आरोप करून माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी खळबळ उडवून दिली. याबाबत प्रतिक्रीया देताना ना.थोरातांनी विखेंना पक्षनिष्ठेवरून चिमटे काढले आहेत. ते म्हणाले, त्यांना पक्ष बदलण्यासाठी सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे. त्यांच्या वक्तव्याला मीच काय कोणीही महत्व देत नाही.
साडे चार वर्षांत काँग्रेस पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदे दिली. त्यांनी कसा पक्ष वाढविला, कसे पक्षविरोधी काम केले, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता ते काय बोलतात याला महत्व देण्याची गरज नाही. आता ते जिथे गेले तिथे त्यांनी अल्पावधीतच मित्र वाढविले आहेत. ही त्यांची जुनी कार्यपध्दती आहे.
हाती सत्ता नसल्याने विरोधी पक्षात बसण्याची वेळ आल्याने ते काहीही बोलतील. आपण संकटाच्या काळात कायम काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलो. कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष सोडण्याचा विचार ही कधी मनात आला नाही. अडचणीच्या काळात काम केले आणि करत राहणार आहे.
2 लाखांवरील कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील
अनेक लाटा आल्या पण काँग्रेसचा विचार हा देशाच्या विकासाचा शाश्वत असल्याने तो कायम टिकून आहे. आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी,सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणार आहे. कर्जमाफीच्या निर्णयामध्ये कोणत्याही किचकट अटी नसून सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणारे व 2 लाखांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकर्यांना मदत देण्याबाबत ही सरकार काम करत आहे.
जिल्हा परिषदेत आघाडीचाच अध्यक्ष
राज्यात जिल्हा परिषदांसाठी ही महाविकास आघाडी एकत्र काम करणार असून अहमदनगर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल, असा विश्वासही ना.थोरात यांनी व्यक्त केला.