अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लवकरच संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरा नगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या दोन्हीही कारखान्याच्या निवडणुकीसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात संगमनेरची जबाबदारी उपविभागीय अधिकारी संगमनेर शैलेश हिंगे यांची, तर विखे पाटील कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक भाऊराव आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरसह राज्यात नावलौकिक असणार्या संगमनेरच्या थोरात कारखाना आणि प्रवरानगरच्या विखे पाटील कारखान्यासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून आता निवडणूक निर्णय अधिकारी यांचीही नियुक्ती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आली आहे. यात संगमनेर साखर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश शालिग्राम हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेरचे तहसीलदार धीरज बाळासाहेब मांजरे काम पाहणार आहेत. तर डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर काम पाहणारा असून त्यांना राहाता येथील तहसीलदार अमोल रमाकांत मोरे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मदत करणार आहेत.
याबाबतचे आदेश राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाच्या वतीने काढण्यात आले असून पुढील आठवड्यात या दोन्ही साखर कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच याचदरम्यान राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक होणे बाकी आहे. दरम्यान, विखे आणि थोरात साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर कोणत्याही हरकती आल्या नव्हत्या. यामुळे प्रसिध्द करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी अंतिम करण्यात आली असल्याची माहिती सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्यावतीने देण्यात आली.