Friday, May 31, 2024
Homeनगरथोरात कारखाना उसाला 2835 रुपये भाव देणार - आ. थोरात

थोरात कारखाना उसाला 2835 रुपये भाव देणार – आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी नैतिकतेच्या पायावर येथील सहकार उभा केला आहे. सर्व सहकारी संस्थांचा आलेख चढता क्रमाने आहे. कारखान्याने अत्यंत अडचणीतून चांगले काम करताना यावर्षी 10 लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. आगामी काळात कार्यक्षेत्रात ऊस वाढवण्याबरोबर एकरी शंभर टन उत्पादन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रातील उसाला प्रति टन 2835/- रुपये भाव दिला जाणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले.

- Advertisement -

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते. तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर, माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, शंकर पा. खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, कारखान्याचे व्हा. चेअरमन संतोष हासे, संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिकराव यादव, सौ. मंदाताई वाघ, श्रीमती मीराबाई वर्पे, रामदास पा. वाघ, संभाजीराव वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीबरोबर उत्पादकांनी आधुनिक प्रणालीचा वापर करून कमीत कमी एकरी शंभर मे. टन उत्पादन होईल यासाठी काम केले पाहिजे. कमी खर्च, कमी श्रम आणि जास्त उत्पादन हे सूत्र घेतले तर उसाला जादा भाव देता येईल.

यावर्षी कारखान्याने दहा लाख मे.टनाचे गाळप केले असून याबरोबर सहा कोटी बावीस लाख युनिटची वीज निर्मिती, अल्कोहोल निर्मिती, रूफ टॉप वीज निर्मिती, विविध खतांची निर्मिती केली आहे. सीएनजी पेट्रोल पंप सुरू केला असून आगामी काळात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प येतो ही यशस्वी वाटचाल सुरू आहे. यावर्षी कार्यक्षेत्राबाहेरील 2715 रुपये प्रति टनाने भाव तर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांकरिता 2835 रुपये भाव दिला जाणार आहे.

निळवंडे धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला 2014 ते 19 कालव्यांची कामे थंडावली होती. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच रात्रंदिवस कामाला गती दिली. करोना काळातही या कामाचा पाठपुरावा केला. आपले सरकार असते तर डाव्या कालव्यातून दोनदा आणि उजव्या कालातून एकदा पाणी दिले असते. पाणी तालुक्यात आले आपण मोठा आनंदोत्सव साजरा केला. मात्र हा आनंद काहींना पहावत नसल्याने तातडीने पाणी बंद केले. यावर्षी अत्यंत कमी पाऊस आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. भोजापूर धरण भरत आहे तर राजकीय फोनाफोनी सुरू आहे यामुळे पाणी वाया जाण्याची भीती आहे.

तालुक्यातील विकास कामांना काहींनी स्थगिती दिली आहे. दहशत निर्माण करून विकास कामे रोखली जाणे हे अत्यंत चुकीचे आहे. पण यामुळे विकास थांबणार नाही, असा इशारा देताना गणेश कारखाना आठ वर्षे त्यांना चालवता आला नाही. तो कारखाना चांगला असून त्या क्षेत्रात ऊस उत्पादन चांगले आहे. तेथील सभासद, कामगार यांनी आपल्यावर विश्वास ठेवला. ते सर्व आपल्या पाठीशी भक्कम असून या कारखान्याच्या कर्जाला काही लोक अडथळे निर्माण करत आहेत. मात्र अडचणींवर मात करून तो कारखाना चांगला चालेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण काम करताना सर्वात जास्त रिकव्हरी कारखान्याने मिळवली आहे. डिस्टीलरी काम सुरू असून पोटॅश निर्मिती, ऊर्जा निर्मिती, इथेनॉल सह विविध उपपदार्थ निर्माण करून कारखान्याची आर्थिक ताकद आणखी वाढवली जाईल. शेतकर्‍यांनी आधुनिकतेने शेती करत कमी पाणी व श्रमात जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, देशात सर्वत्र खाजगीकरणाला वाव दिला आहे. मात्र सहकार हा सर्वसामान्यांसाठी आहे. तो टिकला पाहिजे आणि वाढवला पाहिजे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वावर चालणारा संगमनेरचा सहकार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशाला दिशादर्शक ठरला आहे.

यावेळी भारत वर्पे, तात्याबा बोराडे, सुभाष गुंजाळ, विलास वर्पे यांचेसह विविध सभासदांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी लहानभाऊ गुंजाळ, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र चकोर, नवनाथ आरगडे, विष्णूपंत रहाटळ, के. के. थोरात, सौ. मीराताई शेटे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, प्रदीप मालपाणी, सौ. निर्मलाताई राऊत, आनंद वर्पे, मिलिंद कानवडे, सुरेश थोरात, सुनीता जोर्वेकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह तालुक्यातील विविध पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेच्या नोटिशीचे वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

समन्यायी कायद्याविरोधात आपणच संघर्ष केला

2014 मध्ये राष्ट्रपती राजवट असताना समन्यायी कायदा लागू झाला. मात्र या कायद्यातील त्रुटींबाबत आपण सातत्याने आवाज उठवला. या कायद्याच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील जनता एकत्र येऊन तालुका बंद ठेवून तीव्र आंदोलने केली. मोर्चे काढले, संघर्ष केला, या कायद्याविरोधात आपली न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे. मात्र संघर्षाच्या वेळेस अनेक पुढारी गप्प बसून होते, अशी टीकाही आमदार थोरात यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या