धुळे – सुरत- नागपूर महामार्गावरील तालुक्यातील फागणे शिवारातील सिमेंटचे गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या एका गोडावूनमधुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकुन 2 लाख 79 हजारांचा सुका गांजा जप्त केला. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
लॉकडाऊन सुरू असतांना गेल्या काही दिवसापासून शहरात बेकायदेशीररित्या कोरड्या भांगची विक्री होत असल्याची चर्चा असल्याने याबाबत माहिती काढून कारवाई करावी, असे आदेश पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिले होते. त्यानुसार धुळे-फागणे रोडवरील सिमेंटचे गोडावूचे पाठीमागे योगेश बाळकृष्ण मेखे (वाणी) यांच्या मालकीच्या गोडावूनमध्ये सुका भांग बेकायदा विक्री करण्याचे उद्देशाने साठवून ठेवला असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने तेथे आज छापा टाकला. तेव्हा योगेश मेखे यांच्या मालकीचे गोडावून मनोज ज्ञानेश्वर चौधरी, (रा.69, अलंकार सोसायटी, अरिहंत भवनजवळ, धुळे) व दीपक बाबुराव कुरे (रा. एकता नगर, देवपूर, धुळे) यांनी भाड्याने घेऊन त्यात 62 कोरड्या भांगेने भरलेल्या असा एकूण 1 हजार 860 किलो कोरडा भांग मिळून आला. त्याची किंमत 2 लाख 79 हजार आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोहेकॉ. रफीक पठाण, श्रीकांत पाटील, पोना. प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, पोकॉ. राहुल सानप, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, दीपक पाटील व गुलाब पाटील यांच्या पथकाने केली आहे.