अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यात बालविवाह प्रश्नाबरोबरच अल्पवयीन मातांचा प्रश्नही गंभीर बनत चालला असल्याचे उघड झाले आहे. तालुक्यात तीन अल्पवयीन मुली गर्भवती तर दोन कुमारी मातांनी मुलांना जन्म दिला असल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाच्या. रजिस्टर मधून समोर आले आहे. ही प्रकरणे तालुक्यातील साकीरवाडी, पाचपट्टा, तिरडे आणि माळेगाव परिसरातील असून, बालविवाह आणि लैंगिक अत्याचाराची वाढती उदाहरणे चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीचे 18 वर्षे व मुलाचे 21 वर्षांपूर्वीचे लग्न गुन्हा ठरतो. गुन्हा सिद्ध झाल्यास एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते.
ग्रामसेवक, बालविकास अधिकारी, ग्राम बाल संरक्षण समित्या नेमण्यात आल्या असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीत ढिलाई दिसत असल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. अकोले आणि राजूर पोलिस ठाण्यांत गेल्या अकरा महिन्यांत 31 पोक्सो गुन्हे नोंद झाले आहेत. पीडित मुलींचे नियमित समुपदेशन आवश्यक असून, कमी वयात प्रसूती करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. तर ग्रामीण भागातील अनेक घटना आरोग्य विभागापर्यंत पोहोचतच नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कुटुंबीयांचे मौन यामुळे प्रकरणे लपून राहतात. काही प्रकरणांत गुन्हा दाखल झालेला नाही.
अल्पवयीन माता हे हिमनगाचे फक्त टोक आहे. बालविवाहामुळे मातामृत्यू वाढतो, बाळ कुपोषित जन्मते आणि आयुष्यभर आरोग्य बाधित होते. हा जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले. कायदा धाब्यावर ठेवून होणारे बालविवाह ही मुख्य कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.




