श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर-नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये पतीपत्नी तर एका डॉक्टराचा समावेश आहे. काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नेवासा रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील कुटे हॉस्पीटल समोर दुधाचा टँकर (नं. एमएच 17 बीझेड 1221) वरील चालकाने मोपेड अॅक्टीव्हा (नं. एमएच 17 सीजे 8524) गाडीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोपेड अॅक्टीव्हा गाडीवरील सुनिल थोरात व त्यांच्या पत्नी स्वाती थोरात यामध्ये जखमी झाले. घटना घडली तेव्हा घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. जमलेल्या नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत त्यांना शहरातील साखर कामगार हॉस्पीटलमध्ये दाखल केले, परंतू येथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मयत घोषित केले.
यातील दुधाचा टँकर हा भरधाव श्रीरामपूरकडे येत होता, या टँकर चालकाने अॅक्टीव्हा गाडीला जोराची धडक दिली. यामध्ये हा अपघात घडला. यामध्ये मोपेड अॅक्टीव्हा गाडीचाही चक्काचूर झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुनिल थोरात यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते मुळचे राहाता तालुक्यातील एकरूखे येथील असून सध्या व्यवसायानिमित्ताने ते श्रीरामपूर येथे स्थायिक होते. येथील साखर कामगार हॉस्पीटल येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर एकरूखे येथे त्यांच्यावर मोठ्या शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तर दुसर्या घटनेत तालुक्यातील वडाळा महादेव येथील संजीवनी क्लिनिकचे डॉ. राजेंद्र सिताराम मैड (वय 49) यांचा सोमवारी (दि. 31) मार्च रात्री 10 वाजेच्या दरम्यान रस्ता अपघातामध्ये ओकवुड वायनरी समोरील झाडाला आदळून मृत्यू झाला. डॉ. राजेंद्र मैड हे काल सोमवारी (दि. 31) मार्च रोजी क्लिनिक मधील रूग्ण तपासणी करूण घरी जात असताना नेवासा रस्त्यावरील ओकवुड वायनरी परिसरात अज्ञात व्यक्ती दुचाकीवर समोरून अंगावर येत होता. ते पाहुन डॉ. मैड यांनी आपली दुचाकी फिरवत झाडाच्या दिशेने वळवली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाला. दुसर्याला वाचविण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव गमावल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरीकांच्या माहितीवरून समोरचा दुचाकीस्वार नशेमध्ये असल्याने त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला पडलेली आढळून आली. यामध्ये डॉ. मैड यांच्या डोक्याला मोठी इजा झाली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत डॉ. मैड यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिकेतून येथील कामगार हॉस्पिटल या ठिकाणी हलविले. या अपघाताची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली.
त्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांनी भेट देत डॉ. राजेंद्र मैड यांच्या वडिलांची तसेच माजी सरपंच अविनाश पवार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ कसार, उत्तमराव पवार व नागरीकांची भेट घेतली. याप्रसंगी स्थानिक नागरीकांच्या माहितीवरून डॉ. मैड यांचे दुचाकी वाहन जोरात असल्याने तसेच दुसरे दुचाकी वाहन आडवे आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने झाडाला आढळून डोक्याला जबर मार लागला. प्राथमिक तपासणी करून साखर कामगार येथील वैद्यकीय अधिकार्यांनी उपचारापूर्वीच डॉ. मैड यांना मयत असल्याचे घोषित केले.
यावेळी वडाळा महादेव येथील ग्रामस्थ तसेच शिरसगाव, आशिर्वाद नगर परिसरातील नातेवाईक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, असा मोठा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर काल मंगळवारी वडाळा महादेव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
मॉलेशेसमुळे अनेकांचे अपघात
नेवासा-श्रीरामपूर रोडवर रेल्वे उड्डाण पुलाजवळ रस्त्यावर अनेक ठिकाणी मॉलेशेस पडले होते. त्याचा अनेक वाहनधारकांना अंदाज न आल्याने अनेकजण घसरून पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. रस्त्यावर पडलेले मॉलेशेस नेमक्या कोणत्या गाडीतून पडले, सदर गाडी कोठे चालली होती? याबाबत तपास होणे गरजेचे आहे.