छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत केंद्र सरकारने ‘बालवाटिका’ या उपक्रमाची या शैक्षणिक वर्षापासून देशभरात सुरुवात केली आहे. तीन टप्प्यांत त्याची विभागणी केली असून याअंतर्गत खासगी शाळांप्रमाणे आता तीन वर्षे वयाच्या मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश दिला जाईल. पहिल्या टप्प्यात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून प्रवेश दिला जाईल तर बालवाटिका-२ मध्ये चौथ्या वर्षापासून आणि बालवाटिका-३ मध्ये पाच वर्षांच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी ही व्यवस्था केवळ खासगी शाळांमध्ये होती. छत्रपती संभाजीनगरमधील केंद्रीय विद्यालयामध्ये शुक्रवारपासून (४ ऑगस्ट) या उपक्रमाची सुरुवात झाली. ४० जागांसाठी ४६४ अर्ज आले होते, अशी माहिती विद्यालयाच्या वतीने देण्यात आली.
देशभर नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारांच्या वतीने केली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात चालू शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू झाले आहे.
या नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरूप आतापर्यंत (बारावी) असे होते. पण नव्या धोरणात १० वी किंवा १२ वी बोर्ड परीक्षेबाबत स्पष्ट असा उल्लेख केलेला नाही. या शिक्षण पद्धतीऐवजी अशी नवी व्यवस्था लागू झाल्याचे प्राचार्य अनिल यादव यांनी नमूद केले.