Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट - अनुसूचित जातीतील 'इतक्या' लाख नागरिकांना मोफत निधूर चुली...

शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट – अनुसूचित जातीतील ‘इतक्या’ लाख नागरिकांना मोफत निधूर चुली मिळणार

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

जगाला भेडसावणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सामाजिक न्याय विभागाने देशात प्रथमच महत्त्वपूर्ण अशा ऐतिहासिक सामंजस्य करारावर ’महाप्रीत’ कंपनीच्या माध्यमातुन स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महाप्रीत कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती संवर्गातील १० लाख लाभार्थ्यांसाठी येणार्‍या काळात मोफत पर्यावरण पूरक निधूर चुलीचेही वाटप करण्यात येणार आहे.

अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या आधारावर शेतकर्‍यांच्या कृषी मालाचा दर्जा वाढवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कार्यरत असणारी ’हिंदुस्थान ऍग्रो को-ऑपरेटिव्ह लिमिटेड तसेच जागतिक स्तरावर कार्बन क्रेडिट निर्माण करणारी सर्कुलॅरिटी इन्होव्हेशन हब आणि देशांमध्ये ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्यासाठी कार्यरत इमरटेक सोल्युशन या संस्थांमध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

बदलत्या हवामानानुसार जगामध्ये कार्बन क्रेडिट निर्माण करण्याचा कल बघता तसेच शेतकर्‍यांना प्रोत्साहित करून त्यांना कार्बन क्रेडिट प्राप्त करून देण्यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असणारे जोएल मायकल हे इंग्लंड येथून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सफाई कामगारांबरोबरच शेतकर्‍यांनाही सामाजिक न्याय विभागाच्या सोबत काम करून आर्थिक पाठबळ येणार्‍या काळात देण्यात येईल असे श्री जोएल यांनी यावेळी सांगितले.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अणुउर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमालाचा दर्जा व टिकवण क्षमता वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले हिंदुस्थान ऍग्रो को-ऑपरेटिव्हचे डॉ. भारत ढोकणे पाटील यांनी या कराराच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणार्‍या लाभार्थ्यांना संधी निर्माण होणार असल्याचे सांगितले.

तर इमरटेक सोल्युशनचे गौरव सोमवंशी यांनी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियेमधील पारदर्शकता आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग अंतर्गत लाभार्थ्यांसाठी त्यांचे हिताचे प्रकल्प राबवून त्यांचे आरोग्य सांभाळण्यां बरोबरच त्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणे, शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे व पर्यावरण पूरक प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून कार्बन क्रेडिट निर्माण करणे,प्लास्टिक क्रेडिट, ब्लॉक चेन संकल्पनांचा प्रत्यक्षात वापर करून जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे , महाप्रीत कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र देवकाते, इमरटेक सोल्युशनचे गौरव सोमवंशी,हिंदुस्थान ऍग्रो को-ऑपरेटिव्हचे डॉ. भारत ढोकणे पाटील, तर जोएल मायकल हे इंग्लंड येथून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या