– ज्योत्स्ना पाटील
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
मागील अनेक लेखांतून आपण विविध प्रकारच्या करिअरविषयी ओळख करून घेतली. आज आपण आपल्या आवडीच्या खेळाच्या शेवटाकडे जाऊया. म्हणजेच आपण प्रथमेशच्या आवडीचा जो खेळ खेळत आलो त्यानुसार आपण खेळाचा शेवटचा टप्पा गाठूया; त्यामुळे तुम्हाला प्रथमेशच्या आवडींविषयी कुणी काय लिहिले, ते सारे डोक्याला ताण देऊन आठवावे लागणार आहे. चला तर मग आपण प्रथमेशच्या आवडींची संपूर्ण लिस्ट तयार करूया. एका कागदावर खाली दिल्याप्रमाणे लिहायचे आहे.
1) प्रथमेशच्या शिक्षिकेने लिहिलेल्या आवडी – मेकॅनिकल इंजिनिअर, डिझायनर, चित्रकार, मदतनीस.
2) प्रथमेशच्या आईने लिहिलेल्या आवडी – चित्र काढणे, गोष्टी ऐकणे-वाचणे, इलेक्ट्रिक वस्तू दुरूस्त करणे, सजावट करणे, किल्ला बांधणे, स्वयंपाकात मदत करणे, पोहणे, पक्षी निरीक्षण, कॅरम खेळणे, विटी दांडू खेळणे, गोट्या खेळणे, गणिताची प्रमेय सोडवणे, आकृत्या काढणे.
3) प्रथमेशच्या बाबांनी लिहिलेल्या आवडी – नेचर फोटोग्राफी, पोहणे, वाचन करणे, सायकलिंग, कार्टून्स पाहणे, वस्तू दुरूस्त करणे, संवाद साधणे.
4) आजोबांनी लिहिलेल्या आवडी – जोडजाड करणे, प्राणी व पक्ष्यांची आवड, संगीत.
5) आजीने लिहिलेल्या आवडी – मदत करणे, औषधांची माहिती जाणून घेणे, गोष्टी ऐकणे.
6) दादाने लिहिलेल्या आवडी – वस्तूंचे ऑपरेशन करणे, लष्कराच्या भाकर्या भाजणे, पसार होणे.
7) बहीण प्रज्ञाने लिहिलेल्या आवडी -शिकवणे, मार्गदर्शन करणे, सायकल चालवणे, तबलजी. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, सर्वांनी लिहिलेल्या प्रथमेशच्या आवडी आपण पाहिल्यात. आता यातील एकच आवड किती जणांनी लिहिली आहे ते आपण पाहूया.
1) गोष्टी ऐकणे-वाचणे : आई, बाबा, आजी.
2) पोहणे : आई, बाबा.
3) पक्षी निरीक्षण : आई, बाबा, आजोबा.
4) वस्तू दुरूस्त करणे – शिक्षिका, आई, बाबा, आजोबा, दादा.
5) सायकलिंग : बाबा, दादा, प्रज्ञा.
6) मदत करणे : शिक्षिका, आई, आजी, दादा.
7) संगीत : आजोबा, प्रज्ञा.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, प्रथमेशच्या आवडी आता आपण एका तक्त्यात लिहून काढूया. प्रथमेशची सर्वात जास्त सदस्यांनी सांगितलेली आवड कोणती? आणि त्यानंतर सांगितलेली दुसर्या क्रमांकाची आवड कोणती? अशाप्रकारे तुम्ही प्रथमेशची आवड भविष्यात कोणते करिअर करण्यास अधिक उपयोगी ठरेल हे शोधून ठेवा. मी खेळाचा निकाल तुम्हाला पुढच्या लेखात सांगणारच आहे. बघूया, तुम्ही काढलेले उत्तर आणि मी सांगितलेले करिअर यांची गोळाबेरीज जमते का? तोपर्यंत शोधून ठेवा. भेटूया पुढच्या लेखात.
तुमची,
ताई