Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधयोगी मोदींच्या वाटेने ?

योगी मोदींच्या वाटेने ?

महिन्यांवर आली आहे. भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आगामी विधानसभेत योगी आदित्यनाथांनी आपली खुर्ची कायम ठेवली तर ते नक्कीच राष्ट्रीय राजकारणात जाऊ शकतात. एका अर्थाने असे घडले तर 2002 प्रमाणेच भाजपची स्थिती होऊ शकते. नरेंद्र मोदी यांनी 2002 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताना राष्ट्रीय नेतृत्वाची पायाभरणी केली. योगींच्या बाबतीतही दोन दशकांनंतर भाजपमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे पाहणे औचित्याचे ठरेल.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. सत्ताधारी भाजप आणि योगी सरकारने आचारसंहितेअगोदर विकासकामांचा धडाका लावला आहे. उत्तर प्रदेशची विधानसभा 2024 च्या दृष्टीने भाजपसाठी केंद्रात वापसी करण्यास महत्त्वाची मानली जात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राजकीय भवितव्यही पणाला लागले आहे. अर्थात, ही निवडणूक भाजपला पर्यायी नेतृत्व तयार करण्यासाठीदेखील महत्त्वाची आहे. एकीकडे उत्तर प्रदेशची निवडणूक देशाच्या राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट करणार असून त्याचवेळी भाजपअंतर्गत असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणुकीतून मिळणार आहेत.

2022 मध्ये एका अर्थाने भाजपत 2002 सारखी स्थिती निर्माण होऊ शकते. 2002 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदी यांची राजकीय उंची वाढली आणि त्यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल टाकले. याप्रमाणे उत्तर प्रदेश निवडणुकीत योगी आदित्यनाथ विजयी झाले तर उत्तर प्रदेशबाहेरदेखील ते एक राष्ट्रीय नेते म्हणून नावारूपास येऊ शकतात. त्याचबरोबर भाजपत मोदींनंतर कोण? या प्रश्नाचे उत्तरही काही प्रमाणात मिळू शकते.

- Advertisement -

अलीकडेच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजकीय प्रस्ताव मांडला होता. राष्ट्रीय पातळीवरच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याची संधी देणे हा एकप्रकारे योगी यांचा सन्मानच होता. विधानसभेला योगी जिंकले तर त्यांची राजकीय उंची आणखी वाढेल. भाजप कार्यकर्त्यांत विशेषत: उत्तर प्रदेशात नेहमीच ‘मोदी-योगी’ असा नारा दिला जातो. पण त्या घोषणेतील तथ्य निवडणुकीच्या निकालानंतरच सिद्ध होईल. भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचा विश्वास किती योग्य किंवा चुकीचा आहे, हे निकालातून स्पष्ट होईल. योगींना दिलेल्या संधीबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कार्यकारिणीत प्रस्ताव मांडण्याची संधी देण्यात चूक काय? योगी हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते आपल्या कामामुळे जनतेत लोकप्रिय आहेत. त्यामुळेच त्यांना संधी देण्यात आली. यावरून एक गोष्ट लक्षात येईल आणि ती म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे राजकीय वजन हे उत्तर प्रदेशबाहेरही वाढत चालले आहे.

2002 चे नरेंद्र मोदी आणि योगी यांच्यातील समान धागा म्हणजे तत्कालीन काळात मोदींचा चेहरा पुढे करून पहिल्यांदा निवडणूक लढली गेली. तत्पूर्वी त्यांना मिड टर्ममध्येच मुख्यमंत्री म्हणून समोर आणले होते. उत्तर प्रदेशचा विचार करता 2017 मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असले आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असला तरी आतापर्यंत राज्यात मुख्यमंत्री म्हणून अन्य पर्यायी नाव समोर आलेेले नाही. यंदाही एका अर्थाने त्यांच्या चेहर्‍यावरच उत्तर प्रदेश निवडणूक लढली जाणार आहे. या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने बाजी मारली तर त्याचे श्रेय योगींनाच मिळेल आणि त्यांची प्रतिमा उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणात आणखी उंचावू शकते.

गुजरातमधील 2002 च्या निवडणुका आणि आता उत्तर प्रदेश 2022 च्या निवडणुकीत आणखी एक समान धागा आहे. तो म्हणजे गुजरात निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात आले. त्यांच्याकडे राष्ट्रीय नेते म्हणून पाहिले गेले. गोव्यामध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता त्याच वाटेने मुख्यमंत्री योगी यांच्याकडेदेखील राष्ट्रीय नेते म्हणून अनेक जण पाहत आहेत. भविष्यात भाजपचे नेतृत्व म्हणून योगी यांच्यावर अनेक समर्थकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आशा एकवटलेल्या आहेत. 2022 मध्ये त्यांनी भाजपला विजय मिळवून दिला तर ते नक्कीच राष्ट्रीय राजकारणात आघाडीचे नेते म्हणून समोर येतील.

उत्तर प्रदेशातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली एकजुटीने काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नरेंद्र मोदी आणि योगी यांच्या कार्यपद्धतीमध्ये आणि व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक साम्यस्थळे आढळतात. हे दोन्हीही नेते कौटुंबिक पाश नसणारे आहेत. नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करण्यात आले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक त्यांच्या या स्वतंत्रपणाचा प्रचार करण्यात आला होता. मोदींच्या इमेज बिल्डिंगमधील तो एक भाग होता. कौटुंबिक व्यवधाने नसणारी व्यक्ती देशासाठी अधिक समर्पितपणाने कार्यरत राहू शकते, अशी मांडणी तेव्हा करण्यात आली होती. तसाच प्रकार योगींच्या बाबतीतही केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे योगींची मोदींप्रमाणेच प्रशासनावर पकड आहे. उत्तर प्रदेशातील प्रशासनात असणार्‍या बाबूशाहीला योगींनी आपल्या कडक स्वभावाने बर्‍याच अंशी चाप लावण्यात यश मिळवल्याचे तेथील जाणकारांचे म्हणणे आहे. योगी आदित्यनाथ हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना भाषेचा अडसर नाही. हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये त्यांना पसंती दर्शवणारा वर्ग मोठा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये योगींची आक्रमक तोफ धडाडताना दिसून आली.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच बोलताना असे म्हटले आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय जितका आवश्यक आहे, तितकाच 2022 मध्ये योगींचा विजयही महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवून देण्यामध्ये अमित शहांचा वाटा मोठा राहिला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

2024 च्या निवडणुकांमध्ये भलेही योगींचा चेहरा पुढे आणला गेला नाही तरी 2029 साठी त्यांच्या प्रतिमा संवर्धनाचे, त्यांना देशव्यापी बनवण्याचे कार्य सुरू झाले आहे, हे आता उघडपणाने दिसू लागले आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये गुजरात मॉडेलचा डंका पिटला गेला होता. तशाच प्रकारे गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशातील विकासकामांविषयी देशभरात चर्चा घडवून आणली जात आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांनी उत्तर प्रदेशात एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. बॉलिवूडची चंदेरी नगरी उत्तर प्रदेशात हलवण्यासंदर्भात योगींनी घेतलेल्या या पुढाकाराची सर्वदूर चर्चा झाली. अशा राष्ट्रीय किंवा देशव्यापी मुद्यांना हात घालत योगींच्या लोकप्रियतेची लिटमस टेस्ट घेण्याचे काम पडद्यामागे सुरू असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्यांना यामागचे राजकारण कधी समजत नाही. पण थोडा विचार करून पाहिल्यास 2013-14 च्या पूर्वी नरेंद्र मोदी यांच्याविषयी, त्यांच्या विकास कार्याविषयी किती जणांना माहिती होती? पण 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या काळात आणि त्यानंतर जो-तो स्वतः गुजरातला भेट देऊन आल्याच्या आविर्भावात बोलू लागला होता. त्यामुळे आजच्या प्रसिद्धी माध्यमांचा बोलबाला असणार्‍या काळात प्रतिमा निर्मिती करणे हे फारसे अवघड राहिलेले नाही. मुद्दा इतकाच की, त्याला लोकप्रतिसाद कितपत मिळतो? भारतीय मतदार हा अत्यंत सुज्ञ आहे. गेल्या 70 वर्षांत मतदारांनी आपल्या या सुज्ञपणाचे दर्शन अनेकदा घडवले आहे. त्यामुळे मोदींनंतर योगी यांचा फैसला हा सूज्ञ समाज अत्यंत हुशारीने घेईल, याबाबत शंका नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या