Saturday, July 27, 2024
Homeब्लॉगटायगर अभी जिंदा है !

टायगर अभी जिंदा है !

नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्तांतरानंतर अपेक्षित असलेले घमासान पाहायला मिळाले असले तरी विधान परिषदेत आ. एकनाथराव खडसे यांनी विविध मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा केलेला प्रयत्न बघता व त्यावर सरकारची झालेली कोंडी पाहता आगामी काळात हा संघर्ष अधिक रंगत जाण्याची चुणूक दिसून आली. 30 वर्ष विधानसभा गाजवणारे नाथाभाऊ आता वरिष्ठ सभागृहात पोहोचल्याने व पहिल्याच दिवसापासून सरकारला धारेवर धरण्याचा त्यांचा जुना हातखंडा बाहेर काढल्याने ‘टायगर अभी जिंदा है’चा इशराच भाजपाला दिल्याचे स्पष्ट होत आहे.

पूर्वीच्या एदलाबाद व आताच्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अनेक दिग्गजांनी केलेले आहे. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांपासून मधुकरराव चौधरींनी या मतदारसंघातून विजय मिळवलेला होता. 1985 मध्ये समाजवादी काँग्रेसच्या तिकिटावर हरिभाऊ दगडू जवरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1990मध्ये या मतदारसंघात प्रथमच भारतीय जनता पार्टीने दमदार उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वरणगावचे डॉ. बळीराम जंगले यांचे नाव चर्चेत आले. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर एकनाथराव खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणजे अनामत जप्त करण्यासाठीच असायचा असा उल्लेख नेहमी व्हायचा. परंतु, खडसेंनी दमदार प्रचाराला प्रारंभ करीत निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात तत्कालीन आमदार हरिभाऊ जवरे समाजवादीच्या तिकिटावर तर काँग्रेसच्या तिकिटावर प्रतिभाताई पाटील यांचे बंधू डॉ.जी.एन पाटील यांनी निवडणूक लढवली. या तिरंगी लढतीत एकनाथराव खडसेंना 35 हजार 52, जी.एन पाटील यांना 32 हजार 390 तर हरिभाऊ जवरे यांना 30 हजार 853 मते मिळाली. या तिरंगी लढतीत खडसेंचा 2 हजार 662 मतांनी विजय झाला व त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. त्यावेळी भाजपाचे मोजकेच आमदार विधानसभेत होते. त्यामुळे खडसेंना त्यावेळी भाजपाचे फायब्रांड नेते गोपीनाथ मुंडेंनी अनेक विषयांवर बोलण्याची संधी दिली. त्यातच विधानसभाध्यक्ष म्हणून मधुकरराव चौधरी असल्याने त्याचा त्यांना लाभ झाला. पहिल्याच आमदारकीत त्यांनी विधासनभा गाजवली. त्याचा लाभ त्यांना 1995 मध्ये झालेल्या निवडणुकीत झाला. यावेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अ‍ॅड. रवींद्र पाटील मैदानात उतरले. त्यावेळी खडसेंना 67 हजार 86 तर रवींद्र भैय्यांना 49 हजार 527 मते मिळाली.

या निवडणुकीत खडसेंना 17 हजार 559 मतांनी विजय मिळाला. दुसर्‍यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यासह खान्देशात भाजपाला वाढविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. गावागावात भाजपा पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्याचा लाभ त्यांना पुढील काळात झाला. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पासून फारकत घेत राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत खडसे भाजपाकडून, डॉ.जी.एन पाटील काँग्रेसकडून तर अ‍ॅड.रवींद्र पाटील राष्ट्रवादीकडून मैदानात होते. या तिरंगी लढतीत नाथाभाऊंना 59 हजार 223, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना 34 हजार 167, डॉ.जी.एन पाटील यांना 26 हजार 667 मते मिळाली. त्यामुळे तिरंगी लढतीचा लाभ मिळवत खडसे 25 हजार 56 मतांनी विजयी होत तिसर्‍यांदा विधानसभेत पोहोचले त्यांच्या कारकिर्दीतील हा विक्रमी मतांनी मिळवलेला विजय होता. तिसर्‍यांदा विजय मिळवल्याने खडसे आता भजापाच्या टॉपच्या नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत खडसेंविरुध्द पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. रवींद्र पाटील मैदानात उतरले. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच अ‍ॅड. रवींद्र भैय्यांचे वडील सहकारातील ज्येष्ठ नेते शिखर बँकेचे माजी अध्यक्ष प्रल्हादराव पाटील यांचे दु:खद निधन झाले. त्यामुळे मतदारसंघात भैय्यांसाठी सहानुभूतीची लाट तयार झाली. तरीही या निवडणुकीतदेखील खडसेंना 69 हजार 6 तर भैय्यांना 67 हजार 157 मते मिळाली. रवींद्रभैय्यांचा 1849 मतांनी पराभव करीत खडसे चौथ्यांदा विजयी झाले. 2009 मध्ये खडसेंना 85 हजार तर रवींद्र पाटलांना 67 हजार 310 मते मिळाली. त्यामुळे नाथाभाऊ 18 हजार 389 मताधिक्य मिळवत पाचव्यांदा विधानसभेत पोहोचले. 2014 मध्येदेखील त्यांनी सहाव्यादा भाजपातर्फे उमेदवारी केली. यावेळी भाजपा-सेनेची युती तुटली. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसनेेचे चंद्रकांत पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले. परंतु, त्याला सामोरे जात खडसेंनी 85 हजार 657 मते मिळवली तर चंद्रकांत पाटलांना 75 हजार 949 मते मिळाली. 9 हजार 708 मतांनी विजयी होत नाथाभाऊ सलग सहाव्यांदा विधानसभेत पोहोचले. परंतु, 2019 च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवत शेवटी त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. अटीतटीच्या या लढतीत चंद्रकांत पाटील यांना 91 हजार 92 तर रोहिणी यांना 89 हजार 135 मते मिळाली व चंद्रकात पाटील 1957 मतांची आघाडी घेत काठावर विजय मिळववत गेल्या तीन दशकापासून सुरु असलेल्या खडसेंच्या वर्चस्वाला सुरंग लावला. अर्थात त्यासाठी भाजपाचे बळ पाटील यांना होते, अशी चर्चा आजही मतदारसंघात आहे.

- Advertisement -

भाजपात व खडसेंमध्ये काय झाले याचा ऊहापोह या ठिकाणी मुद्दामहून करीत नाही; कारण त्यामुळे अजून पाल्हाळ लांबेल. खडसेंना विधिमंडळापासून दूर ठेवण्याचा भाजपाचा पुरेपूर प्रयत्न होता. अडीच वर्ष ते त्यात यशस्वीदेखील झाले. परंतु, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी खडसेंना न्याय देण्याचा प्रयत्न करीत राष्ट्रवादीकहून नाथाभाऊंना विधान परिषदेवर पाठवत खान्देशचा ढाण्यावाघ पुन्हा विधानभवनात पोहोचला.

खडसेंचा पिंड नेमका विरोधी पक्षाचा असल्याने व आता राज्यात शिंदे- फडणवीसांचे सरकार असल्याने त्यांनी अधिवेशनाची सुरुवात होताच त्याची झलक दाखवली. तीस वर्षांचा विधिमंडळ कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांनी विविध माध्यमातून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचेच एकेकाळचे सहकारी आज मंत्री म्हणून काम करीत असले तरी त्यांना अडचणीत आणण्याची संधी नाथाभाऊंनी सोडली नाही. विशेषता नाथाभाऊ आता सातव्यांदा आमदार झाले असले तरी सहावेळा ते खालच्या सभागृहात होते.मंत्रीपदाच्या काळात अल्प का होईना ते विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदीदेखील होते.परंतु आता भूमिका बदललली ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर ते तुटून पडायचे त्यांचीच बाजू मांडत आता एकेकाळच्या सहकार्‍यांना धारेवर धरणे वाटते तेवढे सोपे नव्हते.मात्र राजकारण नसानसात भिनलेल्या खडसेंनी सभागृहात पाय ठेवताच सरकारला घाम फोडायला सुरुवात केली.मग वाळूचा मुद्दा असो की महिलांवसरील अत्याचाराचा त्यांच्या मुद्यांवर मंत्रांना उत्तर देणे देखील कठीण गेले.एक तर खडसेंना भाजपातील अंतर्गत सर्वबाबी माहित आहेत.त्यामुळे त्यांना भाजपाने कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येणार नाही अशी भिती वाटत असतांनाच आता सरकारचा उपयोग करीत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे.आधीच चार वर्षांपासून इडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावलाच आहे.आता दुध संघातील चौकशीचा देखील समावेश झाला आहे.परंतु चौकशीला घाबरतील ते खडसे कसलूे म्हणून त्यांनी देखील हे आव्हान स्विकारत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे. असे असलेल तरी सरकारला तोड देत त्यांनी आपली कन्या रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून व अ‍ॅड.रवींद्र पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या माध्यातून घराघरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघात आगामी काळात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणणार्‍यांसाठी त्यांनी आतापसूनच तयारी सुुरु केली असून गेल्या अनेवर्षांपासून शरद पवारांनी मुक्ताईनगरचे पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी कंबर कसली असून भाजपाला ‘टायगर अभी जिंदा हेै’चा इशाराच यातून देण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या