Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूज‘बहुरंगी आणि बहुढंगी’ आमदार बदलण्याची वेळ : पाटील

‘बहुरंगी आणि बहुढंगी’ आमदार बदलण्याची वेळ : पाटील

खेडगाव गटात सुनीता चारोस्करांना उत्स्फूर्त प्रतिसाद

दिंडोरी

- Advertisement -

दिंडोरी – पेठ विधानसभा मतदारसंघात आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. विधानसभा सभापती म्हणून काम करण्याचा योग आला, परंतु त्या पदाचा विनियोग मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी न करता केवळ लग्नांमध्ये नाचत राहिले. ज्यांनी मोठे केले त्यांच्याच पाठीवर वार करणार्‍याला धडा शिकविण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. झिरवाळांचे अंतररुप वेगळे आणि बाह्यरूप वेगळे आहे. त्यामुळे या बहुरंगी आणि बहुढंगी माणसाला थांबवण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केले.

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेद्वार सुनीता रामदास चारोस्कर यांचा खेडगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार दौरा संपन्न झाला. या प्रचारादौर्‍येाला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. खेडगाव गटातील बोपेगाव, चिंचखेड, जोपूळ-धामणवाडी, लोखंडेवाडी, राजापूर, मातेरेवाडी, वरखेडा, आंबेवणी, घोडेवाडी, सोनजांब, तळेगाव, तिसगाव, शिंदवड, गोंडेगाव, जऊळके वणी, खेडगाव या गावांमध्ये महाविकास आघाडीचे नेते श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे, दत्तात्रय पाटील, राजेंद्र ढगे, प्रकाश पिंगळ, पांडुरंग गणोरे, रमेश चौधरी, आप्पा वटाणे यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत गावोगावी कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला.यावेळी दत्तात्रय पाटील बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, निवडणूक ही ऐतिहासिक वळणावर येऊन थांबली आहे. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाला पहिल्या महिला आमदार म्हणून सुनीताताई चारोस्कर याच निवडून येणार आहेत.

सत्तेची मस्ती विद्यमान आमदारांना आली आहे आणि मस्ती आल्यावर थांबवावेच लागते. त्यामुळे आपल्या सर्वांच्या हक्कासाठी व मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन दत्तात्रय पाटील यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

मतांसाठी झिरवाळांना ‘रिपाइं’ची आठवण : गांगुर्डे
महायुतीमध्ये आरपीआय हा घटक पक्ष आहे. परंतू विद्यमान आमदारांनी आम्हाला कधीही विश्वासात घेतले नाही. संगतीला आणि पंगतीला वेगळे असे कामकाज आमदार झिरवाळ यांनी केले. आता निवडणुकीच्या तोंडावर आमच्या मतांची आवश्यकता असल्याने आता आमची आठवण झिरवाळांना आली आहे. मागील कालावधीत आमची आठवण का आली नाही, असा सवाल उपस्थित करुन आमच्या सर्व सहकार्‍यांनी सुनीताताई चारोस्कर यांना पाठिंबा देण्यासाठी एकमत केल्याचे प्रतिपादन आरपीआयचे सरचिटणीस बाळासाहेब गांगुर्डे यांनी केले.

विद्यमान आमदारांनी राजकारणाचा खेळखंडोबा केला आहे. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार होते. परंतु त्यांचा विकास गेला कुठे? असा सवाल गांगुर्डे यांनी विचारला. ठराविक ठेकेदारांना हाताशी धरलेले आहे आणि त्या ठेकेदारांकडून राजरोसपणे लुट चालू आहे. आमदारांची चौकशी केल्यास आमदार सदैव मुंबईला असायचे. मुंबईला जावून ज्यांनी पाहुचार घेतला तेच सध्या आमदारांची बाजू मांडतांना दिसत आहे. सर्व सामान्य माणूस बाजू मांडतांना दिसत नाही. कारण त्या सर्व सामान्य माणसाला आमदारांचा विकास दिसत नाही, हे तितकेच खरे…! लवकरच सहकार्‍यांचा मेळावा घेऊन आम्ंही आमची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आरपीआयचे सरचिटणीस बाळासाहेब गांगुर्डे यांनी दिली.

शेटे – पाटील यांच्या प्रतिष्ठेसाठी चारोस्करांचा विजय महत्त्वाचा : डोखळे
विद्यमान आमदारांना आपले नेते श्रीराम शेटे आणि दत्तात्रय पाटील यांनी मोठे केले. परंतु त्यांच्या विचाराशी गद्दारी करुन आज त्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. आज शेटे साहेब आणि दत्तात्रय पाटील यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील निवडणुकीत कदाचित आम्ही एकमेकांच्या विरोधातही लढू परतु तुमच्या स्वाभिमानाला आज ठेस पोहचली आहे. त्यामुळे शेटे साहेब आणि दत्तात्रय पाटील यांची प्रतिष्ठा कायम राहण्यासाठी व गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन चारोस्करांना निवडून आणू, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयराम डोखळे यांनी व्यक्त केला आहे.

रत्नाकर पगारेंना अपुरे ज्ञान; मला मार्गदर्शन करू नये : लोखंडे
आठवले गटाचे कार्यकर्ते रत्नाकर पगारे हे अपुर्‍या ज्ञानातून खोटी माहिती पसरवत आहे. मी कधीही माझ्या स्वतःसाठी किंवा वैयक्तिक काम हे कधी झिरवाळ साहेबांकडून केले नाही. जे काही काम मागितले असेल केले असेल ते फक्त समाजासाठी केले आहे. मला मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून मी झिरवाळांनाच मतदान केले आहे. परंतु त्यांनी सध्याच्या घडीला घेतलेली भूमिका ही मला वैयक्तिक रित्या एक कार्यकर्ता म्हणून पटलेली नाही म्हणून मी आज त्यांच्यासोबत नाही. तरी रत्नाकर पगारे यांनी मला मार्गदर्शन करू नये.

रत्नाकर पगारेच स्वतः 2014 ला पक्षाची भूमिका बाजूला ठेवून कोणाला पाठिंबा दिला होता? हे त्यांनी सांगावे मग समाजाबद्दल बोलावे. मागील काळामध्ये झिरवाळ यांनी जो गावागावांमध्ये निधी दिला. त्यामध्ये प्रामुख्याने माझ्या गावातील बुद्ध विहार ननाशी नळवाडापाडा उमराळे बु कोचरगाव व इतर ठिकाणी जे काय कामे दिले ते मी स्वतः झिरवाळ साहेबांकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे झाली आहे. त्यामध्ये रत्नाकर पगारेंसारख्या कार्यकर्त्याचा काहीही सबंध नाही. माझ्या पाठपुराव्याचे साक्षीदार देखील उपलब्ध आहेत.

माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नये. आंबेडकरी समाज हा कायमस्वरुपी पुरोगामी विचारासोबत शाहू फुले, आंबेडकर यांना मानणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे की रत्नाकर पगारे हे फक्त व्हाट्सअप, फेसबुक पुढारी आहे. प्रत्यक्ष तालुक्यामध्ये काय कामे झाली ही त्यांना कल्पना नसावी म्हणून येत्या निवडणुकीत समाज योग्य उमेद्वाराच्या पाठीमागे उभे राहील, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संतोष लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...