राजकारणातील वाचाळवीरांनी लोकांना अक्षरश: वीट आणला आहे. वाचाळता ही आता कोणा एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. सर्वच पक्षांमध्ये रोज नवनवे वाचाळवीर उदयास येताना दिसतात आणि त्यांच्या वाचाळतेचे नमूने माध्यमात प्रसिद्ध होतच असतात. वाचाळवीरांना आवरावे असे बहुधा कोणालाच वाटत नसावे का? वाचाळतेच्या बाबतीत ‘जात्यातले सूपात आणि सुपाले जात्यात’ याचा जनता अनुभव घेत असते. सरकारमधील वाचाळ मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्याची प्रतिमा डागाळते. तेव्हा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळ मंत्र्यांना आवरावे असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी केल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. वाचाळांना वेसण घालायला हवी याबाबत कोणाचेेही दूमत नसावे. पण या बाबतीत सर्वच पक्षांची अवस्था ‘उडदामाजि काळेगोरे, काय निवडावे निवडणारे’ अशी झाली आहे का? एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात आणि वादग्रस्त विधाने करण्यात सगळ्याच पक्षाचे अनेक नेते त्यात्यावेळी आघाडीवर असल्याचे आढळते. सत्ताप्राप्ती झाली की मराठी भाषेची दूरवस्था दूर करण्याच्या आणाभाका सगळेच घेतात. पण प्रत्यक्षात मात्र राजकीय वाचाळवीरांच्या बेताल बडबडीमुळे भाषेचा स्तर खालावत चालला आहे हे जाणत्यांच्याही लक्षात येत नसेल का? सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा आहे. राज्यात अनेक सुसंस्कृत नेते होऊन गेले. राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी वैचारिक मतभेद बाळगुनही राजकारणापलीकडची मैत्री जोपासली. मैत्रीत आणि कौटुंबिक नातेसंबंधांतमध्ये राजकारण येऊ न देण्याचे भान नेहमीच दाखवले. त्याचे दाखले विविध वक्ते अधूनमधून देतात. स्व. यशवंतराव चव्हाण, एसएम जोशी, श्रीपादराव डांगे अशा अनेक नेत्यांनी याचा आदर्श आचरणातून घालून दिला. पण त्याचे क्षणिकही प्रतिबिंब आजच्या राजकारणात का दिसू नये? सभांमधून भाषणे करताना सगळेच नेते राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा दाखला देतात. पण त्यांच्या विचारांचे आचरण केले पाहिजे असा उपदेश मात्र जनतेला करतात. सतत वादग्रस्त विधाने करुन, धर्म आणि संस्कृती वेठीला धरुन माध्यमांना चर्चेला आणि लोकांना चघळायला नवनवे मुद्दे देण्याचा ठेकाच बहुधा अनेकांनी उचलला असावा का? अशा वाचाळवीरांमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघते. सामाजिक द्वेष वाढीस लागतो. सामाजिक शांतता धोक्यात येते. सर्वोच्च न्यायालयाने देखील याबद्दल नुकतीच कठोर टिपण्णी केली. धार्मिक किंवा सांप्रदायिक प्रक्षोभक विधाने करणार्यांविरुद्ध पोलीसांनी स्वत:हून कारवाई करावी असे म्हटले. पण केवळ कारवाई चिथावणीखोरांना आळा घालू शकेल का? हे वाटते तेवढे सोपे आहे का? वाचाळवीर एकटेच नसतात. त्यांच्या सावलीत दोन-चार जण तयार होतच असतात. अशी वाचाळवीरांची फौज बाळगणे ही सर्वच राजकीय पक्षांची गरज बनली असावी का? या सगळ्या गदारोळात जनतेच्या प्रश्नांचा मात्र बळी जात आहे याकडे दुदैर्वाने कोणाचेच लक्ष नाही. की तसे लक्ष जाऊ नये म्हणूनच वाचाळवीरांना आवर घातला जात नसावा? विरोधी पक्षनेत्यांनी खरे तर योग्य सूचना केली आहे. ती सर्वच पक्षातील नेत्यांना लागू असावी. तथापि राज्याच्या राजकीय क्षेत्रात सगळीकडुनच ढोबळपणा चाल करत आहे. त्यातील वाचाळवीर ही मोठीच अडचणीची बाब ठरत आहे. त्यांना वेसण घातलीच पाहिजे. पण ती कशी? त्याचेही पर्याय नेतेमंडळींनीच सुचवायला हवेत.