अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सीएट कंपनीचे टायर परस्पर विक्री करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून दोन लाख 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इरशाद निशार अहमद (वय 55 रा. रामपूर कुमियान, तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश) व अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा (वय 24 रा. जिन मैदान जवळ, चाळीसगाव रस्ता, धुळे) अशी जेरबंद केलेल्या दोघांची नावे आहेत.
तामीळनाडू येथील परकोट मारिटिमा एजन्सीमार्फत कंटेनर (पीबी 13 एडब्लू 5064) मध्ये गुजरात येथून तामीळनाडू येथे सीएट कंपनीचे टायर पाठवण्यात आले होते. मात्र, ड्रायव्हरने टायर विकून कंटेनर रिकामा करून तो पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारात उभा केला होता. ही घटना 27 डिसेंबर 2024 रोजी घडली होती. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करून संशयित आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी इरशाद निशार अहमद हा धुळे येथे असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्याला 19 जानेवारी रोजी अटक केली. त्याच्याकडील चौकशीत टायर विक्रीत साथीदारांचा सहभाग उघड केला.
त्याच्या माहितीनुसार, पसार संशयित आरोपी जावेद उर्फ जोसेफ शेख आणि त्याचा मित्र अन्सार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांनी काही टायर अब्दुल कय्युम शहा यास विकले होते. पुढील चौकशीत अब्दुलकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित टायर अनिस हयात खान (रा. देवपूर, जि. धुळे) यांच्या दुकानाच्या जागेत साठवण्यात आल्याचे समजले. पथकाने अनिसकडून दोन लाख 52 हजार रुपये किमतीचे 12 टायर जप्त केले. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.
ही कारवाई निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बापूसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, सागर ससाणे, महादेव भांड यांच्या पथकाने केली.