Friday, May 3, 2024
Homeधुळेअंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीतून बाहेर पडणार-माजी आ.अनिल गोटे

अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीतून बाहेर पडणार-माजी आ.अनिल गोटे

धुळे । प्रतिनिधी dhule

राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण राष्ट्रवादीतून स्वखुशीने बाहेर पडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आ.अनिल गोटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पक्ष सोडला तरी शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असे सांगून श्री.गोटे यांनी पुनश्च जय लोकसंग्रामचा नारा दिला आहे.

- Advertisement -

श्री.गोटे म्हणाले की, भाजपामधील गटबाजी, गुंडांना खुलेआम समर्थन व संरक्षण तसेच प्रोत्साहन देण्याच्या मनोवृत्तीस कंटाळून आपण मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा व पक्षाचा राजीनामा देवून बाहेर पडलो. राष्ट्रवादीत स्वच्छेने प्रवेश घेतला. सलग चार वर्षे शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारून माझ्यासह लोकसंग्राम मधील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत सहभागी झाले. अर्थात काही कार्यकर्त्यांना माझा हा निर्णय मान्य नव्हता परंतु, तरीदेखील ते माझ्यासोबत पक्षात आले. धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले दिवस यावेत. यासाठी धुळे, शिंदखेडा, साक्री तालुक्यात 108 ठिकाणी शिवार बैठका घेतल्या. गरीब कष्टकर्‍यांना न्याय मिळावा, यासाठी नवीन शाखांची निर्मिती तसेच पक्षाच्या फलक अनावरणाचे कार्यक्रम आयोजित केले. परंतू कोविड महामारीमुळे शरद पवार यांच्या आदेशाने शिवार बैठका थांबविल्या. त्यामुळे पक्ष उभारणीच्या कामाला खीळ बसली, ती कायमचीच असे गोटे यांनी सांगितले.

पक्षातील गटबाजी थांबवून पक्ष संघ ठेवण्याच्या प्रयत्नास यश न आल्याने तसेच पक्षातून बाहेर पडलो तर पक्ष नेतृत्व गटातटाचे राजकारण संपुष्टात आणू शकेल, या विचारातून मी व माझ्या सहकार्‍यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत वरिष्ठ नेतृत्वास देखील कळविले आहे. गटबाजीत वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा आपण आपल्या वेळेचा सदुपयोग धुळेकर जनतेच्या रस्ता, पाणी, सार्वजनिक स्वच्छता या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करु, असेही गोटे म्हणाले.

धुळेकर जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. त्यामुळे शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी मला पुन्हा आमदार व्हावे लागणार आहे. मी निधड्या छातीचा आहे, जे काही करायचे असेल ते समोरुन करतो. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला त्यावेळी विरोध झाला नसता तर हा मार्ग झाला असता, असेही गोटे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या