तिसगाव |वार्ताहर| Tisgav
मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर तात्काळ वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे आदेश मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्यानंतर प्राधान्याने
पाथर्डी तालुक्यातील लाभधारक तलावात पाणी सोडण्यात आले. तिसगावच्या पाचीआंबा पाझर तलावात वांबोरी चारीचे पाणी प्रथमच पाहताच या परिसरातील शेतकर्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आल्यानंतर मंत्री तनपुरे यांच्या हस्ते तिसगाव येथील पाचीआंबा पाझर तलाव व शिरापूर येथील पाण्याने तुडूंब भरलेल्या बंधार्यातील पाण्याचे जलपूजन शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी वांबोरी चारी कृती समितीचे उपाध्यक्ष बाबासाहेब भिटे, सरपंच अमोल वाघ, ज्येष्ठनेते सुनील पुंड, संजय लवांडे, माजी सरपंच इलियास शेख, युवा नेते जालिंदर वामन, अजय पाठक, भाऊसाहेब लवांडे, प्रकाश शेलार, राजेंद्र मरकड, बाबासाहेब बुधवंत, पिनू मुळे, नितीन लवांडे, अविनाश नरवडे, सुनिल लवांडे, इक्बाल शेख, नाथा वाबळे, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे, गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे, ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब सावंत, नारायण नजन, उपअभियंता सरोदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
तिसगावच्या पाचीआंबा पाझर तलावात गेल्या 14 वर्षानंतर वांबोरी चारीचे पाणी आल्याचे पाहून या परिसरातील शेतकर्यांनी तळ्यात साठवणारे पाणी पाहताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व जलपुजनासाठी उपस्थित राहीलेल्या मंत्री तनपुरे यांना त्यांनी पाण्याबाबत दिलेला शब्द पाळण्यात समाधान व्यक्त करत धन्यवाद दिले.
यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर प्राधान्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले असून राहुरी व पाथर्डी तालुक्यातील एकूण 27 पाझर तलावात सध्या पाणीपुरवठा सुरू असून त्यापैकी पाथर्डी तालुक्यातील 15 तलावात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू असून तिसगाव सातवड घाटशिरस मढी शिरापुर कौडगाव भोसे लोहसर या भागातील सर्व पाझर तलावात सध्या पाणी सुरू असून तिसगावच्या ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करणार असून या वर्षी तिसगावला पाणी टंचाई भासणार नाही एवढे पाणी तिसगावकरांना निश्चितपणे दिले जाईल, अशी ग्वाही नामदार तनपुरे यांनी यावेळी दिली.