Saturday, May 18, 2024
Homeनगरतिसगावच्या पाण्याच्या टाकीत रासायनिक द्रव टाकल्याचा प्रकार

तिसगावच्या पाण्याच्या टाकीत रासायनिक द्रव टाकल्याचा प्रकार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील तिसगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक द्रव टाकल्याचा धक्कादायक प्रकार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीत उघडकीस आला. या घटनेने संतप्त झालेल्या तनपुरे यांनी तिसगावच्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत यासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तर या भेटीत तनपुरे यांनी सेतू केंद्राला भेट देत पाहणी करत तहसील कार्यालयातील काही अधिकार्‍यांना चांगलीच समज दिली.

- Advertisement -

तिसगाव येथील नागरिकांनी येथील ग्रामसेवक बाबत तसेच तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांबाबत तक्रारींचा पाढा तनपुरे यांच्याकडे वाचला. यानंतर तनपुरे यांनी पाथर्डी येथे येत तहसील व पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली.

तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसीलदार शाम वाडकर यांना बरोबर घेत तहसील कार्यलयाच्या परिसरात असलेल्या सेतू केंद्राला भेट देत पाहणी केली. याठिकाणी कोणता दाखला किती दिवसांत मिळेल, त्यासाठी किती फी भरावी लागेल याचे फलक न लावल्याने तनपुरे यांनी मी परत आठ दिवसांनी येणार असून त्यावेळी असे फलक दिसायला हवे अशी तंबी दिली तर त्यानंतर आ. तनपुरे हे पंचायत समिती कार्यलयात गेले. यावेळी अनेकांनी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांच्याकडे तिसगावचे ग्रामसेवक रवी देशमुख यांची तातडीने बदली करा ते कधीही उपस्थित नसतात.

दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीचे झाकण तोडून रासायनिक द्रव अज्ञात व्यक्तीने टाकल्याने ऐंशी हजार लिटर पाणी सोडून द्यावे लागले अशी तक्रार केल्यानंतर तनपुरे सुध्दा अवाक झाले. तातडीने आ.तनपुरे यांनी ग्रामसेवक देशमुख यांना फोन करत दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडूनही तुम्ही अद्याप यासंदर्भात गुन्हा का दाखल केला नाही. तुम्ही पाण्याच्या टाकीची पाहणी अजून का केली नाही, तुम्हाला या घटनेचे गांभीर्य कळते का, गुन्हा दाखल करण्यासाठी थोडेतरी पाणी टाकीत शिल्लक ठेवले का अशा प्रश्नांची सरबत्ती केली तर गटविकास अधिकारी डॉ. पालवे यांनी यावेळी देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्याची परवानगी आपल्याकडे मागितल्याचे स्पष्ट करत देशमुख यांच्याऐवजी दुसर्‍याकडे पदभार देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

यावेळी बाळासाहेब लवांडे, राहुल गवळी, उद्धव दुसुंग, अमोल वाघ, सुनील पुंड, पंकज मगर, राजेंद्र म्हस्के, भाऊसाहेब वाघ, सुनील पालवे, शबाना शेख, प्रदीप ससाणे, अमोल गारुडकर, बिस्मिल्ला इनामदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत रासायनिक विषारी द्रव टाकण्याचा प्रकार गंभीर आहे. याद्वारे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.

– प्राजक्त तनपुरे

- Advertisment -

ताज्या बातम्या