Sunday, November 3, 2024
Homeशब्दगंधइर्शाळवाडीची पुनरावृत्ती टाळायची तर...

इर्शाळवाडीची पुनरावृत्ती टाळायची तर…

डॉ.महेश गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ

नऊ वर्षांपूर्वी 30 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव भूस्खलनामध्ये गाडले गेल्याची दुर्घटना घडली होती. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती घडली आहे. हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत भूस्खलनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामागचे एक कारण मान्सूनचा बदललेला पॅटर्न असून कमी काळात अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत आहे. पण त्यापलीकडे जाऊन विचार केल्यास शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण, निवासी व अन्य कारणांसाठी डोंगर रांगांवर वाढते अतिक्रमण, डोंगरातील खोदकाम, डोंगरावरील वृक्षतोड, निर्वनीकरण इत्यादी स्वरुपातील मानवी हस्तक्षेप हे अशा घटनांचे मूळ कारण आहे.

- Advertisement -

जून महिना जवळपास कोरडा गेल्यामुळे आणि जुलैचा मध्य ओलांडला तरी पावसाची समाधानकारक बरसात न झाल्यामुळे यंदा दुष्काळाचा फेरा सोसावा लागेल अशा चिंतेत महाराष्ट्र असतानाच 19 जुलैच्या रात्री घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याला हादरा दिला. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर डोंगराचा काही भाग कोसळल्यामुळे अख्खे गाव ढिगार्‍याखाली गाडले गेल्याची भीती निर्माण झाली आहे.

या घटनेमुळे 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, कोकण आणि विदर्भासह अन्य काही भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली आहे. माथेरानसारख्या भागात 24 तासांत 570 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर कमी काळात अधिक पाऊस पडल्यामुळे हे भूस्खलन झाले असल्याचे सांगितले जात असले तरी ते तात्कालीक कारण आहे. त्याभोवती विचारमंथनाची चाके फिरत राहिल्यास मूळ प्रश्नाकडे आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याला बगल मिळू शकते. इर्शाळवाडीसारख्या घटना नजिकच्या भविष्यात घडू शकतात, याबाबत डॉ. माधव गाडगीळ यांच्यासारख्या ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञांसह अनेकांनी इशारे दिलेे होते. त्याकडे सत्ताधार्‍यांनी, प्रशासनाने आणि एकंदर राजकीय व्यवस्थेने दुर्लक्ष केल्याचे ताज्या दुर्घटनेवरून म्हणता येईल.

खालापूर तालुक्यातील या गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताही नाहीये. उपलब्ध असणारी पायवाट चिखलात गेल्यामुळे जेसीबी, पोकलँडही घटनास्थळी नेणे अशक्य बनले आणि मानवी हातांनी ढिगारे उपसण्याशिवाय पर्याय उरला नाही. स्वार्थापोटी आणि विकासाच्या हव्यासापोटी निसर्गावर आक्रमण करून त्याचे दोहन करण्याची भूमिका मानवाने बदलली पाहिजे, अन्यथा निसर्ग वेळोवेळी त्याची ताकद दाखवतच राहील, हे इर्शाळवाडीच्या प्रकरणानंतर लक्षात घ्यावे लागेल.

शास्रीयदृष्ट्या पाहिल्यास मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा जमिनीची पाणी मुरवण्याची क्षमताही संपते आणि पाणी प्रवाहित होऊन वाहू लागते. या वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमालीचा असल्यामुळे ते वाटेत येणारे दगड, धोंडे, माती सोबत घेऊन वाहू लागते. अशावेळी तीव्र उतार असेल तर वेग अधिक वाढून हा सगळा मलबा खालच्या दिशेने येतो. थोडक्यात, जमिनीतील मातीचे गुणधर्म, खडक, जमिनीच्या थरांची संरचना आणि पडणारा पाऊस यावर भूस्खलन अवलंबून असते. गेल्या काही वर्षांमध्ये भूस्खलनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामागे हवामान बदलामुळे मान्सूनचा पॅटर्न हे एक मुख्य कारण दिसून येते. कमी काळात अधिक पाऊस पडणे, अतिवृष्टी होणे या घटनांची वारंवारीता वाढत आहे. यासाठी निसर्गाला दोष देणे आपमतलबीपणाचे ठरेल. कारण आज विकासाच्या नावाखाली मानवाने डोंगर सपाटीकरणाचा सपाटा लावला आहे. डोंगरकड्यांवर बंगले, रिसॉर्टस् बांधण्याला परवानगी दिला जाता कामा नये, पण ती दिली जाते. त्यासाठी डोंगराच्या वरच्या भागातील भूस्तर खणला जातो. अशा ठिकाणी साहजिकच पावसाचे पाणी वेगाने मुरते. त्यातून भूस्खलनाला चालना मिळत आहे. पावसाचे चक्र बदलले आहे. कधी 300 मिलीमीटर, कधी 500 मिलीमीटर पाऊस 12-24 तासांत पडेल. त्यामुळे यापुढे या घटना वाढणारच आहेत. पूर्वीच्या काळी जंगल एकसंध होते. आता जंगलांचे तुकडे विकासासाठी वापरले जाताहेत. त्या रिकाम्या जागेत पावसाचे पाणी मुरत चालले आहे. शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण, निवासी व अन्य कारणांसाठी डोंगर रांगांवर वाढते अतिक्रमण, डोंगरातील खोदकाम, डोंगरावरील वृक्षतोड, निर्वनीकरण इत्यादी स्वरुपातील मानवी हस्तक्षेप हादेखील महत्त्वाचा घटक भूस्खलनाला कारणीभूत आहे. हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत सर्वदूर हे चित्र दिसून येत आहे. कारण कोणालाही थांबायचे नाहीये. राज्यातील 15 टक्के भूभाग दरडप्रवण असून त्यामध्ये पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश होतो. अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी या ठिकाणांबाबत सावधगिरीच्या सूचना केलेल्या आहेत. पण सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत कुणालाच त्याचे सोयरसुतक वाटले नाही. उलटपक्षी पर्यटनाला चालना देण्यासाठी डोंगरकडे, टेकड्या, नद्या, समुद्रकिनारे या भागात मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण होताना दिसत आहे. असेच चक्र सुरू राहिल्यास आपत्ती थांबणार कशा? निसर्गाशी असणारी मानवाची जवळीक किंवा नाळ कधीच तुटली आहे. जंगल दरवर्षी नष्ट होण्याचा वेग वाढतोय, हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच नव्हे का? सामान्य व्यक्तीपासून शासन व्यवस्थेपर्यंत सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करावा लागणार आहे.

पर्यावरणीय संकटे, नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत यासाठी मानवाला त्याच्या जीवनशैलीतच बदल करावा लागणार आहे. मानवी हस्तक्षेप न झालेल्या जंगलांमध्ये भूस्खलन होत नाही. याउलट जंगलांची वीण उसवली जाते तिथे भूस्खलनाच्या शक्यता वाढतात. आज विकासाच्या कल्पनेत आपण जंगलांमधे मोठमोठे रस्ते बनवत आहोत. ते बनवताना वनसंपदेचा, जंगलांच्या नैसर्गिक रचनेचा विचार केला जात नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींच्या मुळाशी मानवाची लालसा कारणीभूत आहे. महात्मा गांधींच्या विचारांचे अनुसरण करण्याची नितांत गरज आहे. हा विचार म्हणजे पृथ्वी माणसाची गरज भागवू शकते, मात्र हाव नाही. हा विचार यापुढील जीवनात अंमलात आणलाच पाहिजे, अशी आजची पृथ्वीवर जगणार्‍या भटक्या मानवाची अवस्था आहे. निसर्गानुकूल विचार आणि जीवनशैली अंगिकारणे हाच मानवजात वाचवण्याचा मार्ग आहे.

– शब्दांकनः हेमचंद्र फडके

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या