Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारशहाद्यातील ‘तो’जुगार अड्डा कारवाईपासून लांबच

शहाद्यातील ‘तो’जुगार अड्डा कारवाईपासून लांबच

शहादा ।Shahada

शहादा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भाजी मार्केटमधील जुगार अड्डा अजूनही पोलीस प्रशासनाच्या कारवाईपासून लांब आहे. जिल्हाभरात जुगार अड्ड्यांवर कारवाई होत असताना शहाद्यातील या जुगार अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून परिसरात वारंवार जुगारींमुळे होत असलेल्या वादविवादातून अनेकदा मोठे वाद उद्भवले आहेत. त्यातच आबालवृद्धांसह महिलांचाही भाजी मार्केटमध्ये सतत वावर असताना महिला वर्गाच्या भावनेचा आदर करीत पोलीस प्रशासनाने या जुगार अड्ड्यावर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी महिला वर्गासह नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

शहादा शहरात गत काही महिन्यांपासून विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. या अवैधधंद्यांनी शहराला अक्षरशः वेठीस धरले असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. अवैध धंदे करणार्‍यांना खाकीवर्दीचा धाक आहे की नाही अशी परिस्थिती सध्या शहरात दिसून येत आहे. या अवैध धंदे करणार्‍यांच्या स्पर्धेतून अनेक वेळा शहरात लहान मोठे वाद विवाद झालेले आहेत. मात्र, त्या-त्या वेळेला अवैधधंद्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे प्रकारदेखील केले गेले आहेत. अवैध धंद्याची राजकारणाप्रमाणेच स्पर्धा होत असून एकमेकांना पोलीसी कारवाई अडकविण्याचे प्रकारदेखील होत आहेत. त्यामुळेच शहराच्या शांततेलादेखील तडा जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अवैध धंदे करणार्‍यांना खाकीचा हिसका दाखवणे क्रमप्राप्त ठरत आहे.

सध्या पोलीस प्रशासनाने शहरात अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे अस्र उभारले आहे. तरीदेखील काही अवैध धंदे अजूनही सुरूच आहेत. त्यातील भाजीमार्केटमधील जुगार अड्डा पोलिसांना चॅलेंज करू पाहत आहे आमचे कोणीही काहीही करू शकत नाही अशा अविर्भावात कुठेही वाच्यता करीत डींगे पिटणार्‍या या जुगार अड्डा चालविणार्‍यांनी पोलिसांची प्रतिमादेखील मलीन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच महिला वर्गाचा सर्वाधिक वावर असलेल्या भाजीमार्केटमध्ये या जुगार अड्ड्याचा महिलांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या जुगार अड्ड्यावर कारवाई करून बंद करावा अशी रास्त अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने शहरात ऑपरेशन वॉश आऊट अवैध धंदे ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान , जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी महिला व जनभावनेचा आदर करून भाजी मार्केटमधील त्रासदायक ठरू पाहणार्‍या या जुगार अड्ड्यावर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करावा अशी रास्त अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या