Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री सचिवालयाकडे जिल्ह्यातून 'इतक्या' तक्रारी

मुख्यमंत्री सचिवालयाकडे जिल्ह्यातून ‘इतक्या’ तक्रारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

गावात स्मशानभूमी नाही, रस्त्याची नियमित स्वच्छता होत नाही, समृद्धीमुळे पाइपलाइनचे नुकसान झाले, अशा विविध प्रकारच्या 43 तक्रारी मागील महिन्यात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालयाकडे ( District Level Chief Minister’s Secretariat)दाखल झालेल्या आहेत.या तक्रारींमधून 18 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, राज्य स्तरावर नऊ तक्रारी वर्ग करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde )यांनी राज्यातील जनतेच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावरच निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.त्यामुळे या कक्षातून जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांचा जागेवरच निपटारा होण्यास मदत मिळते आहे.

जिल्हा प्रशासनाकडून संबंधित विभागांकडे या तक्रारी वर्ग करून त्या तातडीने सोडविण्यावर भर दिला जात आहे. 43 पैकी 18 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. नऊ तक्रारींमध्ये राज्यस्तरावरच निर्णय अपेक्षित असल्याने त्या मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आल्या. उर्वरित तक्रारींच्या निपटार्‍याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

जानेवारी महिन्यात या कक्षाकडे तब्बल 43 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये पंचवटीतील एका पुलावर नियमित स्वच्छता होत नाही. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामात सिन्नरमध्ये एका शेतकर्‍याने कंत्राटदार कंपनीने पाइपलाइनचे नुकसान केल्याची तक्रार नोंदवली आहे. तसेच रेशन दुकानातून धान्य मिळावे, केपानगर (ता. सिन्नर) येथे महानुभावपंथीयांसाठी स्मशानभूमीला जागा मिळावी, अशा विविध प्रकारच्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे.

कक्षाची भिस्त एकाच कारकुनावर

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय हा कक्ष जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारित आहे. या कक्षात नायब तहसीलदार, कारकून व शिपायाची नियुक्ती करावयाची आहे. त्यानुसार प्रशासनाने नायब तहसीलदार व कारकून यांची नियुक्ती केली. मात्र, नायब तहसीलदार यांना पेठ येथे नियुक्ती मिळाल्याने कक्षाची भिस्त आता सध्या एकाच कारकुनावर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या