अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
समाजात वाढत असलेले तंबाखूचे सेवन, दारूचे व्यसन आणि आरोग्याविषयीचे दुर्लक्ष यामुळे कॅन्सरचा धोका भीषण स्वरूपात वाढत चालला आहे. विशेष म्हणजे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर कॅन्सरच्या विळख्यात अडकताना दिसत असून योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञ उपचार घेतल्यास कर्करोगावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास नगरच्या मॅककेअर हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सतिष सोनवणे यांनी व्यक्त केला.
डॉ. सोनवणे म्हणाले, कॅन्सर होऊ नये यासाठी शासन आणि सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृतीची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक असून, जागरूकता हीच कर्करोगाविरुद्धची सर्वात प्रभावी कवच आहे. कर्करोग या गंभीर आजाराबाबत नागरिकांना माहिती करून देणे, लवकर निदानाचे महत्त्व समजवणे आणि आरोग्य तपासणीची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. बदलती जीवनशैली, व्यसनाधीनता आणि प्रदूषण यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याबद्दल माहिती देताना डॉ. सोनवणे म्हणाले, कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे होणारा आजार आहे. या पेशी शरीराच्या कोणत्याही अवयवात वाढू शकतात.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार हा जगातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी दुसरा आजार आहे. भारतामध्ये जवळपास दोन-तृतीयांश रुग्णांचे निदान उशिरा म्हणजे शेवटच्या टप्प्यात होते. त्यामुळे उपचार कठीण होतात आणि रुग्णांचा जगण्याचा दर कमी राहतो. जर आजार सुरुवातीला ओळखला तर योग्य उपचारांद्वारे रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक असते. डॉ. सोनवणे यांनी सांगितले की आरोग्य तपासणी शिबिरे, स्क्रिनिंग आणि लवकर निदान यामुळे अनेक जीव वाचू शकतात.
जागरूकतेतच बचाव
कर्करोगाच्या 30 ते 50 टक्के प्रकरणांमध्ये फक्त जोखीम घटक टाळून हा आजार रोखता येऊ शकतो. त्यासाठी- तंबाखू, गुटखा आणि मद्यपान पूर्णपणे टाळणे, संतुलित आहार घेणे नियमित व्यायाम करणे आणि एचपीव्ही लसीकरण करून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करणे. कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जागरूकता हेच सर्वात मोठे शस्त्र आहे, असे डॉ. सोनवणे म्हणाले.
कर्करोगाची सामान्य लक्षणे
सततचा किंवा वाढता खोकला, शरीरावरील न बरी होणारी जखम. स्तनांमध्ये गाठ किंवा सूज, शौचावाटे रक्तस्राव, अचानक वजन कमी होणे, सततचा थकवा, भूक मंदावणे ही आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
नगरमध्येच प्रगत उपचार सुविधा
अलीकडच्या काही वर्षांत नगरमध्ये कॅन्सर उपचारांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरच प्रगत उपचार घेता येतात, त्यामुळे मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज उरलेली नाही. यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, रेडिओथेरपी आणि ब्रॅकीथेरपी यांचा समावेश आहे.
वेळेवर निदान, योग्य उपचार आणि आवश्यक पथ्य पाळल्यास कॅन्सरवर मात करणे पूर्णपणे शक्य आहे. स्तन कॅन्सरसाठी स्क्रिनिंग (मॅमोग्राफी), गर्भाशय मुख कॅन्सरच्या तपासणीसाठी स्क्रिनिंग आणि पॅपस्मेल तपासणी करावी लागते. तसेच तंबाखू खाणार्यांना मुख तपासणी आवश्यक आहे.
– डॉ. सतिष सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ.




