नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात करोनाची( Corona ) दुसरी लाट ओसरली असली तरी, गेल्या आठवड्यापासून मात्र रुग्ण संख्या स्थिर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याबाहेरून आलेले व करोना अहवाल बाधित आढळलेले रुग्णांचे प्रमाण रोज वाढताना दिसत आहे. अहमदनगर( Ahmednagar ) पाठोपाठ आता औरंगाबाद ( Aurangabad )येथून आलेल्या रुग्णांची देखील संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ५ दिवसांपासून सरासरी रोज पाच रुग्ण आढळून येत आहे. आज सर्वाधिक ५ रुग्ण अहमदनगर, ३ औरंगाबादचे रुग्ण नाशिकमध्ये ( Nashik ) आढळून आले आहे.
आतापर्यंत जिल्हाबाह्य रुग्णांच्या संख्येने साडेपाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. धक्कादायक म्हणजे यात नगर जिल्ह्यातील १४ रुग्णांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असल्याने तेथील रुग्ण उपचारासाठी आता नाशिककडे धाव घेत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये काही करोनाबाधितांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित आढळणाऱ्यांची संख्या कमी होत असली तरी तिसरी लाट येऊन धडकण्याची शक्यता आरोग्य यंत्रणा व्यक्त करीत आहेत
दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०५ करोना बाधित आढळून आले आहेत. तर ६९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ग्रामीण भागात ४९, शहरात ४३, मालेगाव क्षेत्रात २ तर जिल्हा बाह्य रुग्णांमध्ये तब्बल ११ रुग्णांची वाढ झाली आहे. बाह्य मध्ये सर्वाधिक ५ रुग्ण अहमदनगर, ३ रुग्ण औरंगाबाद, २ रुग्ण धुळे तर सोलापूरच्या एक रुग्णाचा समावेश आहे.
डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या ट्रेसिंगचे आदेश दिले आहेत. आरोग्य प्रशासनातर्फे घाबरून जाऊ नये तसेच करोनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत ग्रामीण भागात २ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरी भागात एकही मृत्यू झाला नाही. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ५४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे