नाशिक । विजय गिते Nashik
जिल्ह्यातील 13 (सुरगाणा बाजार समिती बिनविरोध) बाजार समित्यांच्या 223 जागांसाठी 537 उमेदवार रिंगणात असून त्यांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी (दि.28) मतदार ठरविणार आहे.मनमाड बाजार समितीसाठी रविवारी (दि.30) मतदान होणार आहे.
बाजार समित्यांच्या निवडणुकीकडे आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे ही निवडणूक अंतिम टप्प्यात अस्तित्व आणि प्रतिष्ठेची झाल्याने मतदारांची पळवापळवी,विविध आमिषे दाखवत साम- दाम- दंड याचा पुरेपूरवापर झाल्याचे दिसून आले. अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा ज्वर चढत जाऊन आरोप-प्रत्यारोपांनी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
प्रत्येक बाजार समितीत नेत्यांनी उमेदवारी देताना आपल्या गटाचा फायदा व विरोधकांचे कसे खच्चीकरण होईल हे पाहिले. तर काहींनी बेरजेचे, तर काहींनी मागील उट्टे काढत कुरघोडीचे राजकारण केले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आरोपांनी रान उठवून दिले.निवडणूक बाजार समितीची मात्र,तयारी विधानसभा, लोकसभाबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम नेत्यांनी करून घेतल्याचे सर्वत्र बघायला मिळत आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा महत्वाच्या निवडणूका लांबणीवर पडल्यामुळे रखडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मातब्बर नेत्यांनी उड्या मारत प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. इतकेच नाही तर लोकसभा व विधानसभेच्या आगामी निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही काही इच्छुक रिंगणात उतरले आहेत.
बनकर , कदमांची प्रतिष्ठा पणाला
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत माजी आमदार अनिल कदम,पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर, युवा नेते गोकुळ गिते यांनी आमदार दिलीप बनकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केल्याने व होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींंमुळे या निवडणुकीकडे आगामी विधानसभा निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे.
भुसे-हिरे गटात कांँटे की टक्कर
मालेगाव बाजार समितीच्या प्रचारात विद्यमान पालकमंत्री दादा भुसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांच्यामध्ये आरोपांचा कलगीतुरा रंगला आहे. लासलगाव बाजार समितीत माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
झिरवाळ यांची अडचण
दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे फोटो दोन्ही गटाच्या पॅनलच्या पोस्टरवर झळकत असल्याने ही निवडणूक चर्चेत आली आहे.येथे कोणत्याही एका पक्षाच्या नावाखाली निवडणूक होत नसून दोन्हीही गटाच्या पॅनलमध्ये सर्वपक्षीय उमेदवार आहेत. त्यामुळे येथे राजकीय पक्षाचे नेतृत्व करणार्या नेतृत्वाचीही राजकीय अडचण होऊन बसली आहे.
कोकाटे – वाजे पारंपरिक लढत
सिन्नरमध्ये विद्यमान आमदार अॅड. माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्यात कांँटे की टक्कर रंगली आहे.
पवार-गावितांमध्ये चुरस
कळवणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार व माजी आमदार जे. पी. गावित या दोघांच्या पॅनलमध्येच चुरशीची लढत होत आहे.
गुरु – शिष्य आमनेसामने
चांदवडमध्ये माजी आमदार अॅड. शिरीषकुमार कोतवाल व त्यांचे पूर्वाश्रमीचे शिष्य म्हणून ओळख असलेले भाजप नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या पॅनलमध्ये कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
देवळ्यात विधानसभेची रंगीत तालीम
देवळ्यात भाजपचे जिल्हाप्रमुख केदा आहेर यांच्यासमोर विरोधकांचे आव्हान कितपत टिकते, हे बघावे लागेल. या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच मतदारांना बघायला मिळत आहे.
भुजबळ यांना आव्हान
माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी येवला व लासलगाव बाजार समितीच्या आखाड्यात उतरत लक्ष केंद्रित करत प्रचारसभाही घेतल्या आहेत. यातून भुजबळ यांनी आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांना आपल्या समोर उभे राहण्याचे खुले आव्हान दिले आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये माजी सभापती जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षीरसागर विरुद्ध पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप यांच्या गटात तुल्यबळ सामना रंगला आहे.लासलगाव बाजार समिती निवडणुकीतील खरी लढाई ही भुजबळ विरुद्ध थोरे अशीच रंगलेली असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हाणामारीमुळे मनमाडकडे लक्ष
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या राड्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मनमाड व नांदगाव समितीत आमदार सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. आमदार कांदे यांच्या विरोधात माजी खासदार समीर भुजबळ व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्यासह माजी आमदार संजय पवार, जगन्नाथ धात्रक आदींनी कंबर कसली आहे.
पिंगळे विरुद्ध पिंगळे अन् चुंभळेमध्ये लढत
नाशिक बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.या निवडणुकीत देविदास पिंगळे यांचे लहान बंधू गोकुळ पिंगळे यांनीही सोसायटी गटातून निवडणूक रिंगणात उतरत मोठे बंधू देविदास पिंगळे यांच्यासमोर आव्हान उभे केल्याने या निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
बारा ठिकाणी आज मतदान; शनिवारी मतमोजणी
जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून सुरगाणा बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 13 पैकी 12 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (दि.28) मतदान होत असून रविवारी (दि. 30) मनमाड बाजार समितीसाठी मतदान होणार आहे. 13 बाजार समित्यांच्या 223 जागांसाठी 537 उमेदवार रिंगणात आहे. 29 जागांवरील निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे.
जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, मनमाड व सुरगाणा अशा 14 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये सुरगाणा बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 संचालक पदांची निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 13 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 223 जागांकरिता 537 उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी (दि.28) मतदार ठरवणार आहे.
सुरगाणा बाजार समितीसाठी असलेल्या 18 जागा तसेच देवळा बाजार समितीच्या आठ तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन अशा एकूण 29 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित तेरा बाजार समितीकरिता सहकारी संस्था गटातून 11 हजार 319 मतदार असून ग्रामपंचायत सदस्य 10 हजार आठशे, व्यापारी 5587 आणि हमाल व मापारी 2582 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शुक्रवारी (दि.28) होत असलेल्या मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया त्याच दिवशी घोटी,देवळा,कळवण,दिंडोरी , सिन्नर, तर शनिवार दि.29 एप्रिल रोजी नाशिक, पिंपळगाव बसवंत , चांदवड, येवला,मालेगाव, लासलगाव या बाजार समित्याची मतमोजणी पार पडणार आहे. तर नांदगाव येथे मतदान आज(दि.28) होऊन मतमोजणी रविवारी (दि.30) होणार आहे.मनमाड बाजार समितीसाठी 30 एप्रिलला मतदान होऊन 1 मे रोजी मतमोजणी होणार आहे.