सुनीता सामंत, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक
आजकालची स्त्री म्हटले की, कर्तबगार, खंबीर, आत्मनिर्भर, तडफदार, बहुआयामी अशीच प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. गेले ते दिवस की स्त्री म्हणजे दुःखी, अन्याय सहन करणारी एक बांधिनी असे चित्र समोर येत असे. पण आज याचा अर्थ असा नाही की, समाज खूप सुधारला आहे आणि स्त्रियांवर अत्याचारच होत नाहीत. पण समाजात अत्याचार सहन करण्यापलीकडे त्याला सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची ताकद स्त्रीने स्वत:मध्ये अंगिकारली आहे, हेही येथे अधोरेखित करायला हवे.
आजही स्त्रीवर अत्याचार झाला तर तो सहन करण्यापेक्षा योग्य वेळी व योग्य ठिकाणी मदत मागण्यासाठी ती धाव घेते. मग ती पोलिसांची असो वा एखाद्या महिला समितीची असो किंवा सामाजिक संस्था किंवा मानसोपचाराचा सल्ला असो. सगळ्या सुधारणेमध्ये समाजाचा आणि सरकारचा मोलाचा वाटा आहे. पण तरीही या समाजामध्ये अन्याय करणार्यांची कमतरता नाही. मग ही गोष्ट घरापासूनच सुरू होते. एखादा व्यसनाधीन पुरुष असेल तर अख्ख्या घराला ते सोसावे लागते. पण तरीही आजची स्त्री आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार होते. नवर्याला सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करते. पण त्याचबरोबर स्वतःलाही त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम करते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
थोडक्यात काय तर आपण दुसर्या व्यक्तीला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे हे जास्त योग्य व शक्य आहे. अन्याय सहन करणे हाही गुन्हाच आहे, हे अनुभवातून स्त्री शिकली आहे. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वर्तमान पत्र, सोशल मीडिया, सिनेमा व मोबाईलचा मोठा वाटा आहे. आजची नारी स्वतःवर झालेल्या अन्यायावर खचून न जाता त्याच्या विरुद्ध लढा देऊन गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी लढा देत आहे. समाजाला निर्भिडपणे सक्षम होऊन सामोरे जाणारी आजची नारी ही खर्या अर्थाने ‘निर्भया’ आहे.
शब्दांकन- विजय गिते