सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगांव उपबाजारात स्वातंत्रदिनाचे औचित्य साधुन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते टोमॅटोच्या लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी पहिल्या जाळीला 1351 रुपयांचा भाव मिळाला. बाजार समितीने टॉमेटो लिलावाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
प्रमुख पाहुणे म्हणून उदय सांगळे, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, अरुण वाघ, संजय सानप, राजेश गडाख, ज्ञानेश्वर गाडे, विठ्ठलराव राजेभोसले, सोमनाथ भिसे, नारायण वाजे, अरुण वारुंगसे, किरण डगळे, सरपंच ईश्वर माळी, सुदाम शेळके, केशवराव कोकाटे, सयाजी भोर, विक्रम वाजे, नंदु वाजे, सुनिल भालेराव उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी 150 वाहनांमधून लिलावासाठी टोमॅटो बाजारात दाखल झाला. प्रारंभाला हिवरगांव येथील संपत घुगे यांच्या टोमॅटोच्या जाळीला 1351 रुपयांनी संगमनेर येथील व्यापारी रिजवान शेख यांनी बोली लावली. हिवरगाव हे सिन्नर व निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर येत असल्याने पंचक्रोशीतील शेतकर्यांना शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामूळे शेतकर्यांचा जाणारा वेळ, श्रम, होणारा खर्च या सर्व बाबींचा विचार करुन हिवरगाव बाजारात टॉमेटोचे लिलाव सुरु केले असल्याचे डॉ. पवार म्हणाले.
शेतमालाचे पैसे रोख स्वरुपात व्यापार्यांकडून प्राप्त करुन घ्यावेत. जो व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करेल, त्याच्याबाबत बाजार समितीकडे तात्काळ लेखी तक्रार सादर करावी. फसवेगिरी करणार्या तोतया व्यापार्यांपासून सावध रहावे असे आवाहन वाजे यांनी केले.
दररोज होणार लिलाव
हिवरगांव उपबाजारात दर सोमवार ते रविवार सप्ताहातील सर्व दिवस दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत टोमॅटो शेतमालाचे लिलाव सुरु राहणार आहेत. शेतकरी बांधवांनी आपली कुचंबना व नुकसान टाळण्यासाठी बांधावर किंवा शिवारमापाने विक्री न करता आपला टोमॅटो शेतमाल हिवरगांव उपबाजार आवारातच विक्रीसाठी आणावा व शेतमाल विक्रीची रोख रक्कम घेवून जावे असे आवाहन बाजार समितीचे वतीने करणेत आले आहे.
लवकरच कांदा लिलाव
शेतकरी हा केंद्रबिंदु मानून बाजार समितीची वाटचाल सुरु आहे. बाजार आवारात वाहनांची गर्दी होणार नाही या दृष्टीने उपाययोजना समितीमार्फत सुरु आहेत. हिवरगाव उपबाजारात लवकरच कांदा शेतमालाचा लिलाव देखील सुरु करण्याचा समितीचा मानस असल्याचे सभापती डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.