अक्कलकुवा । श. प्र.- Akkalkuva
देशभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा मोठा फायदा शेतकर्यांना होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या टोमॅटोच्या किंमतीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. अक्कलकुव्यात पेट्रोलच्या दराला टोमॅटोच्या दराने मागे टाकले आहे. अक्कलकुवा येथे टोमॅटोचे दर 120 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. मात्र 120 रूपयातही टमाटर खाण्यासारखे नाही.
पावसाने ओढ लावल्याने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत जवळपास सर्वच भाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढू लागले आहेत. विशेष म्हणजे किरकोळ बाजारात टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचे दर आंब्याहूनही अधिक आहेत. बाजारात टोमॅटो आणि हिरव्या मिरचीने शंभरी गाठली आहे. इतर भाज्यांच्याही दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत दर अधिक वाढण्याची शक्यता भाजी विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.